दिगंबर शिंदे

शिराळा तालुक्यातील मणदूर या दोन ते अडीच हजार लोकसंख्येच्या गावात गेल्या पंधरा दिवसांत ४६ रुग्ण आढळले आहेत. जिल्हयात पर्यटनासाठी एकमेव आकर्षण असलेल्या चांदोली अभयारण्यात जाण्यासाठी याच गावच्या वेशीतून जावे लागते. आता कुठे पर्यटनामुळे तरुण पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत असतानाच करोनाने अख्खे गावच वेठीला धरले आहे. गावात करोना संसर्गाचे सामूहिक संक्रमण होऊ लागले आहे. करोनाची साखळी तोडणे हेच आता आव्हान ठरले आहे.

सांगली जिल्हय़ात सर्वाधिक रुग्ण या एका गावात आढळून आले आहेत. ३१ मे रोजी गावातील वृद्धाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर गेल्या १५ दिवसांत येथील रुग्णसंख्या वाढत आहे. बाधितांची संख्या रोज वाढत असल्याने या गावातील करोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

नोकरीसाठी मुंबईची वाट

शिराळा तालुका जिल्हय़ातील डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. कोकणाप्रमाणेच निसर्गाने मुक्त हाताने सौंदर्य उधळले आहे. गावातील पाच-सहाशे लोक मुंबईकर आहेत. तसे या तालुक्यातील सुमारे १५ ते १६ हजार  लोक मुंबई निवासी आहेत. करोनाचा संसर्ग सुरू होताच मुंबईतून गडय़ा आपला गाव बरा असे म्हणत गावी येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.  तसेच याच तालुक्यालगत असलेल्या कोल्हापूर जिल्हय़ातील शाहूवाडी आणि रत्नागिरी जिल्हय़ात जाणारेही बरेचजण आहेत. पुण्याहून गावी जाणाऱ्यांसाठी रत्नागिरीकरांसाठी हा नजीकचा मार्ग आहे.  शिराळा तालुक्यातील रुग्णसंख्या ५७ वर पोहोचली आहे. तालुक्यामध्ये निगडी, रेड, मोहरे, करूंगली, मोहरे, रिळे, मोहरे आदी ठिकाणी बाधित आढळले आहेत.

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न

मणदूरमधील लोकसंख्या आणि रुग्णसंख्या पाहता संख्या जास्त आहे. गेली अडीच महिने गावाने टाळेबंदीचे पालन केले. आता टाळेबंदीतून सवलत मिळाली असताना रुग्ण आढळल्याने गावालाच टाळे ठोकण्यात आले आहे. गावातील सर्वच व्यवहार ठप्प आहेत. यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत असला तरी गावचा अर्थव्यवहार असलेला पशुपालनाचा जोडधंदा अडचणीत आला आहे. धंदा एकवेळ पुन्हा उभा राहू शकतो. मात्र दावणीच्या जनावरापुढे काय टाकायचे हा प्रश्न आहे. डोंगराला जनावरे चरून येत होती, दावणीला दुधाचा रतीब घालत होती. आता मान्सूनही सुरू झाला आहे, डोंगराला हिरवे गवत आहे. मात्र पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांचे चाऱ्याअभावी हाल होत आहेत.

मणदूर गावातील ३०० व्यक्तींचे स्वॅब करोना चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. गावातील व्यक्तींचा एकमेकांशी संपर्क येणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात येत असून जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागाची वेगवेगळी सात  पथके गावात कार्यरत करण्यात आली असून ३० जणांचे पथक घरटी जाऊन तपासणी करीत आहे. करोनाची साखळी तोडण्यास आरोग्य विभाग प्रयत्न करीत असून याला लोकांचेही सहकार्य मिळणे गरजेचे आहे.

– डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा आरोग्याधिकारी.