News Flash

कष्टकऱ्यांच्या घरकुलांच्या प्रश्नावर आ. प्रणिती शिंदे-आडम भिडले

कष्टकरी कुटुंबीयांना शासकीय योजनांअंतर्गत अत्यल्प दरात घरकुले उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून मोठय़ा प्रमाणात रक्कम गोळा केली व त्यानुसार कोणालाही घरकुले उपलब्ध दिली

| December 15, 2014 01:58 am

दलित, अल्पसंख्याक, महिला कामगार, कष्टकरी कुटुंबीयांना शासकीय योजनांअंतर्गत अत्यल्प दरात घरकुले उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून मोठय़ा प्रमाणात रक्कम गोळा केली व त्यानुसार कोणालाही घरकुले उपलब्ध करून दिली नाहीत, असा माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यावर आक्षेप घेत या प्रकरणात शासनाने हस्तक्षेप करावा आणि आडम मास्तर यांनी घेतलेले पैसे व्याजासह परत करावेत, या मागणीसाठी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. आडम मास्तर यांनीही त्यांना प्रत्युत्तर देत शिंदे पिता-पुत्रांवर प्रत्यारोप केला आहे.
काँग्रेस भवनापासून निघालेल्या या मोर्चात सुमारे दीडशे कष्टकरी महिला कामगारांचा सहभाग होता. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, महापौर प्रा. सुशीला आबुटे, माजी महापौर अलका राठोड, आरीफ शेख, महापालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी, पालिक स्थायी समितीचे सभापती सय्यद बाबा मिस्त्री यांच्यासह पक्षाचे बहुसंख्य नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ज्यांच्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला, त्या संबंधित कष्टकऱ्यांचा त्यात अपेक्षित सहभाग नसल्याबद्दल बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी, हा मोर्चा छोटा असला तरी त्यामागील भावना मोठय़ा असल्याचे नमूद केले.
काँग्रेस भवनापासून अवघ्या शंभर पावलांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला, तेव्हा झालेल्या सभेत बोलताना आमदार शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीतील आपले राजकीय प्रतिस्पर्धी आडम मास्तर यांच्यावर कठोर शब्दात प्रहार केला. दहा वर्षांपूर्वी आडम मास्तर यांनी अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे विडी महिला कामगारांसाठी कॉ. गोदूताई परूळेकर यांच्या नावाने दहा हजार घरकुलांचा प्रकल्प कार्यान्वित केला. परंतु त्यासाठी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रात वजन वापरले होते. अन्यथा हा प्रकल्प मार्गी लागला नसता. त्यानंतर आडम मास्तर यांनी दलित, अल्पसंख्याक, महिला कामगार, बांधकाम मजूर व इतर कष्टकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने अत्यल्प दरात घरकुले साकार करण्याचे आमिष दाखवून हजारो कष्टकऱ्यांना सभासद करून घेतले व त्यांच्याकडून कोटय़वधींची रक्कम घेतली. परंतु अशा योजनांसाठी कोणतीही शासकीय योजना नाही किंवा तसा आदेश नसताना आडम मास्तर यांनी दिशाभूल करून प्रचंड रकमा गोळा केल्या. त्याचा साधा हिशेबही सामान्य सभासदांना मिळत नाही. अनेक गोरगरीब सभासदांनी सोन्याचे किडूकमिडूक, दागिने गहाण ठेवून आडम मास्तरांकडे प्रत्येकी २० हजारांपेक्षा जास्त रकमा जमा केल्या. त्यांना घरकुलेही मिळत नाहीत व घेतलेले पैसेही परत मिळत नाहीत. त्याबद्दल जाब विचारणाऱ्या सभासदांना त्रास दिला जातो, असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.
यावेळी प्रकाश यलगुलवार, महापौर प्रा. आबुटे, हेमगड्डी तसेच महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा प्रा. ज्योती वाघमारे, पीडित सभासदांपैकी जंगलप्पा गुत्ते, पूजा वाघमारे, अंजना शिवसिंगवाले, शाहेदा शेख, नूरजहाँ मकानदार आदींनी आडम मास्तर यांच्यावर टीकास्त्र सोडले. निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना शिष्टमंडळाने भेटून निवेदन सादर केले.
शिंदे पिता-पुत्रीकडूनच ‘खो’
दरम्यान, यासंदर्भात नरसय्या आडम मास्तर यांनी आपली बाजू स्पष्ट करताना सांगितले की, दलित, अल्पसंख्याक महिला व कष्टकऱ्यांसाठी ३० हजार घरकुलांची योजना राज्य व केंद्राकडे सादर केली होती. यापूर्वी विडी महिला कामगारांसाठी साकारलेला दहा हजार घरकुलांचा यशस्वी प्रयोग पाहून केंद्राने ४५०० घरकुलांचा पथदर्शी प्रकल्प बनविण्यास व त्यासाठी ५० टक्के अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. यात राज्य शासनाने ३५ टक्के अनुदान देण्याची मागणी केली असता सुरुवातीला शासनाने प्रतिसाद दिला. परंतु नंतर हे प्रकरण गेल्या सव्वा वर्षांपासून प्रलंबित ठेवले आहे. यात सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी अडथळा आणल्याचा आरोप आडम मास्तर यांनी केला. सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळेच शिंदे पिता-पुत्रीकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी राजकारण खेळले जात आहे, असा आरोप आडम मास्तर  यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2014 1:58 am

Web Title: home scheme problem morcha
टॅग : Morcha
Next Stories
1 दुष्काळात मंत्र्यांच्या सत्काराचा सुकाळ!
2 विविध कलाविष्कारांना तरुणाईची उत्स्फूर्त दाद
3 आयआयएमसाठी औरंगाबादकर इरेला!
Just Now!
X