डिसेंबर महिन्यात २२ तारखेला मध्यरात्री येथील शिवाजी चौकातील चपलेचे दुकान फोडून त्यातील मालसामानासह रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. पोलिसांच्या शोधानंतर या चोरटय़ाला पकडण्यात नागोठणे पोलिसांना यश आले असून अंकुश एकनाथ हिलम असे या चोरटय़ाचे नाव आहे. हिलम मावळ, पुणे येथे राहणारा असून त्याला त्या ठिकाणीच ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांनी दिली. याच घटनेनंतर तिसऱ्या दिवशी २४ तारखेला विभागातील वरवठणे येथील एका महिलेच्या घरात जबरीने घुसून तिच्या हातावर कोयत्याने वार करीत तिच्या जवळील अकरा हजार रोख व सोन्याचे गंथन पळवून नेल्याची घटना घडली होती.

हिलम याला ताब्यात घेतल्यानंतर संबंधित चोरटा विजय नागू िहदोळा हा हिलम याचा मित्र असल्याचे उघड झाले आहे. हिलमला रोहे न्यायालयात हजर केल्यानंतर याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून उपनिरीक्षक संदीप पाटील पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, िहदोळा हा सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले असून पुणे, खोपोली आणि कर्जत येथे त्याने गुन्हे केले असल्याचे समजते. िहदोळा सध्या फरार असला, तरी त्याला लवकरच पकडण्याची कामगिरी आमचे पोलीस पथक करेल, असा विश्वास पो. नि. दरेकर यांनी व्यक्त केला आहे.