कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी सहकार चळवळीला आदर्शवत असा कारभार केला असल्याने राज्यातील सहकार चळवळ जिवंत ठेवण्याची लढाई ते निश्चितच जिंकतील असा विश्वास श्रमिक मुक्तिदलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केला. कृष्णा कारखान्याचा सभासदाभिमुख कारभार पाहता अविनाश मोहितेंकडेच कारखान्याची सूत्रे पुन्हा रहावीत म्हणून प्रकल्पग्रस्तांची आंदोलने करणारे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठाम असल्याची ग्वाही पाटणकर यांनी दिली.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतील संस्थापक पॅनेलचा प्रचार शुभारंभ विंग (ता. कराड) येथील मारूतीस श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मोठय़ा गर्दीमुळे सभास्थळी तीन डिजिटल स्क्रीनवर सभेचे लाईव्ह भाषण दाखवण्यात येत होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, की कृष्णा कारखान्याच्या स्थापनेवेळी दिवंगत आबासाहेब मोहिते हे पायातील दगड झाले होते. पण, तद्नंतर दुष्ट प्रवृत्तींनी आबासाहेबांच्या कर्तृत्वाचा इतिहास जाणीवपूर्वक पुसण्याचा प्रयत्न केला. कृष्णाच्या जागृत सभासदांनी मात्र पायातील दगडाची आठवण ठेवून आबासाहेबांचे नातू अविनाश मोहिते यांच्याकडे सत्तेची सूत्रे सोपवली. त्यांनी निश्चितच गौरवास्पद कामगिरी केली आहे.
अविनाश मोहिते यांनी योग्यवेळी विरोधकांच्या भ्रष्टाचाराचे गाठोडे सोडणार असल्याची घोषणा आज येथे पूर्ण केली. ते म्हणाले, संस्थापक पॅनेलची सत्ता आल्यानंतर विरोधकांचा राजकीय अड्डा असणारा नियोजन कक्ष उघडला असता, तेथे अलिबाबा आणि चाळीस चोरांप्रमाणे भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे मिळाले. साखरेचे दर ५० रूपये किलो झाले तरी सभासदांना २ रूपये किलोने साखर देणार असल्याची ग्वाही त्यांनी देताच सभासदांनी टाळय़ांच्या गजरात या भूमिकेचे स्वागत केले. सहकार कायद्यामुळे निवडणूक लढण्यास अपात्र ठरू नये म्हणून भोसले कुटुंबीयांनी जयवंत शुगरच्या संचालकपदांचे राजीनामे दिलेतर मोहिते बंधूंनी सत्तेच्या काळात काळा पैसा पांढरा करण्यासाठी यशवंतराव मोहिते विचारमंच नावाचा ट्रस्ट स्थापून भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी अशोकराव थोरात, बाळासाहेब शेरेकर यांचीही भाषणे झाली.