आठवडय़ात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज

पुणे : राज्यात पाऊस पुन्हा कहर घालण्याची शक्यता वातावरणातील बदलांमुळे निर्माण झाली आहे. सध्याची पोषक स्थिती कायम असतानाच बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी या आठवडय़ात राज्याच्या सर्वच भागात प्रामुख्याने मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज आहे. १८ ते २० सप्टेंबर या काळात मोठय़ा पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात ऑगस्टच्या सुरुवातीला बहुतांश भागात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली होती. कोकण विभागालाही त्याचा फटका बसला होता. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातही अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेत थेट सप्टेंबरच्या सुरुवातीला ऐन गणेशोत्सवात जोरदार हजेरी लावली होती. कोकण विभागात सर्वाधिक पाऊस झाला. मुंबई आणि ठाण्यामध्ये सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने बहुतांश भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. राज्यात अनेक ठिकाणी रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूकही विस्कळीत झाली होती.

गेल्या आठवडय़ापासून राज्याच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतो आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये क ोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. पुढील दोन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर १९ आणि २० सप्टेंबरला राज्यात सर्वच ठिकाणी पाऊस पडणार असून, काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  मराठवाडा आणि विदर्भातही चांगल्या पावसाची शक्यता आहे.

पावसाची शक्यता कुठे आणि कधी?

कोकण विभागात पालघर आणि ठाणे जिल्ह्यमध्ये १७ आणि १८ सप्टेंबरला जोरदार, तर १९ आणि २० सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी या भागातही या दोन दिवसांत मुसळधारांची शक्यता आहे. विदर्भात धुळे आणि जळगाव जिल्ह्यत १८ ते २० सप्टेंबर दरम्यान मुसळधारांची शक्यता आहे. नंदूरबारमध्येही पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यंत १९ आणि २० सप्टेंबरला जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुण्यातही या काळात पाऊस होणार आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यत काही ठिकाणी १७ ते २० सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस होणार आहे. बीड आणि िहगोलीतही चांगल्या पावसाची शक्यता आहे.

पावसाला पोषक स्थिती कशामुळे

सध्या मध्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र आहे, त्याचप्रमाणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरही कमी दाबाचा पट्टा असल्याने गेल्या काही दिवसांत कोकण विभागासह राज्याच्या बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस आहे. बंगालच्या उपसागरात आता नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या स्थितीमुळे पश्चिम आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.