14 August 2020

News Flash

सोलापूर शिवसेनेत मोहिते, कोठेंचे महत्त्व वाढले

नवी पदरचना जाहीर

सोलापूर जिल्हा शिवसेनेची पुनर्रचना करण्यात आली असून यात अकलूजचे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांची जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुखपदी तर सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांची सोलापूर शहर विभागाची जबाबदारी असलेल्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सेनेत नवखे असलेले मोहिते-पाटील व कोठे या दोघांवर जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जाते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्हा शिवसेनेत हे फेरबदल करताना उर्वरित पदाधिका-यांना कायम ठेवले आहे. कोठे यांना जिल्हा प्रमुख करण्यात आल्यामुळे आता जिल्हा प्रमुखाची पदसंख्या तीन झाली आहे.
खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी कायम करून त्यांच्या सोबत डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांची सहसंपर्क म्हणून वर्णी लावण्यात आली आहे. पुरुषोत्तम बरडे हे यापूर्वी सहसंपर्क प्रमुखपदाची धुरा सांभाळत होते. त्यांच्यासाठी आता जिल्हा समन्वयक हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे.
लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ, मंगळवेढा व अक्कलकोट या तीन भागांसाठी जिल्हाप्रमुख म्हणून काम करतील. शिवाय शेजारच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला जोडलेल्या बार्शीचीही जबाबदारी ठोंगे-पाटील हेच सांभाळतील. तर कुर्डूवाडीचे धनंजय डिकोळे हे माढा लोकसभा मतदारसंघातील माढा, पंढरपूर, करमाळा, माळशिरस व सांगोला या भागाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
जिल्ह्यात पक्षसंघटनेत हे फेरबदल करताना आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका विचारात घेण्यात आल्या आहेत. अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील डॉ. धवलसिंह हे दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत. जिल्हा परिषद सदस्य असलेले धवलसिंह यांच्या ताब्यात सदाशिवनगरचा शंकर सहकारी साखर कारखाना व सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँक आदी संस्था आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर संघटनेचे उपाध्यक्षपदही ते सांभाळतात. आक्रमक आणि लढाऊवृत्तीचे युवा नेते म्हणून ओळखले जाणारे धवलसिंह मोहिते-पाटील हे शिवसेना पक्षश्रेष्ठींनी सोपविलेली नवी जबाबदारी कशाप्रकारे सांभाळतात, हे नजीकच्या काळातच दिसेल.
सोलापुरात काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचे राजकारण अनेक वष्रे सांभाळलेले आणि अलीकडे शिंदे यांच्यापासून दूर गेलेले विष्णुपंत कोठे यांचे महेश कोठे हे चिरंजीव आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत असताना गेली २५ वष्रे महापालिकेच्या कारभाराची सूत्रे कोठे यांच्याकडेच होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी शिंदे यांना उघडपणे आव्हान देत त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेच्या माध्यमातून लढत दिली होती. त्यानंतर आता महापालिकेवर आपले वर्चस्व राहण्यासाठी महेश कोठे हे शिवसेना-भाजप युतीची ताकद वाढविण्यासाठी व्यूहरचना करीत आहेत. यापूर्वी महापालिकेत काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून सत्तेच्या चाव्या स्वतकडे ठेवताना कोठे हे भाजप-सेना युतीच्या दृष्टिकोनातून ‘खलनायक’ मानले जात. परंतु आता बदलत्या राजकीय परिस्थितीत हेच कोठे युतीच्या विशेषत शिवसेनेच्या गळ्यातील ‘ताईत’ बनले आहेत. त्यामुळेच नवखे असूनही शिवसेनेत त्यांचे महत्त्व वाढले आहे. त्यांचे हे वर्चस्व जुने व निष्ठावंत शिवसनिक सहन करणार की ‘तू तू-मैं मैं’ चा प्रकार घडणार, याकडेही राजकीय जाणकार लक्ष ठेवून आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2015 3:30 am

Web Title: importance increase of kothe and mohite in shiv sena in solapur
टॅग Shiv Sena,Solapur
Next Stories
1 महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
2 अवैध अर्जाबाबतच्या याचिका फेटाळल्या
3 संताजी घोरपडे स्मारकासाठी ५० लाखांचा निधी मंजूर
Just Now!
X