महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकाला दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विषयावर बोलायचे प्रकर्षाने टाळले. राज ठाकरे यांच्या मनसेने सुद्धा आता हिंदुत्वाची वाट धरली आहे. मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे भाजपासोबतची वर्षानुवर्षाची युती तुटण्याच्या प्रश्नावर बोलत असताना, मुलाखतकार संजय राऊत यांनी त्यांना मनसे बाबत प्रश्न विचारला.

“भाजपाने विश्वासघात केला. कडवट हिंदुत्ववादी पक्षाला तुम्ही दूर ढकललंत…आणि नको ते पक्ष तुम्ही मांडीवर घेऊन बसलात. हे कसलं हिंदुत्व आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर संजय राऊत यांनी त्यांना नको ते पक्ष म्हणजे तुम्ही ‘मनसे’विषयी म्हणताय का? वृत्तपत्रांतल्या बातम्यांनुसार असं कळतंय की, हे दोन पक्ष एकत्र येताहेत.

आणखी वाचा – भीमा-कोरेगाव तपासात केंद्र सरकारचा अधिकारही कोणी नाकारलेला नाही – उद्धव ठाकरे

त्यावर उद्धव यांनी तो विषय गौण आहे असे उत्तर दिले. भाजपाने एनडीमध्ये शिवसेनेला कशी सापत्न वागणूक दिली यावर बोलताना ते म्हणाले की, नितीशकुमार आहेत, मुफ्ती आहे, चंद्राबाबू आहेत, रामविलास आहेत… सगळेच आहेत. म्हणजे त्यांचे जे कडवट विरोधक होते ते तुम्हाला तुमच्या मांडीवर चालतात; पण कट्टर हिंदुत्ववादी पक्ष जो तुमच्यासोबत संकटकाळात राहिला… तो मात्र नकोसा होतो. ही नाती फक्त सत्तेसाठी नव्हती. या 30 वर्षांमधला किती काळ आम्ही सत्तेत होतो? असे उद्धव यांनी सांगितले.