महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील उन्मेषाचा आविष्कार घडविण्याच्या हेतूने आयोजित सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेची नाशिक विभागाची प्राथमिक फेरी दोन व तीन डिसेंबर रोजी येथील महाकवि कालिदास कलामंदिरात  होणार आहे. अस्तित्त्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेसाठी झी मराठी या वाहिनीचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजकत्त्व लाभले आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तूत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची सुरुवात रविवारी पुणे विभागापासून झाली. स्पर्धेचा दुसरा टप्पा नाशिक येथे होत असून स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक प्रशांत हिरे, लेखक चारूदत्त कुलकर्णी हे स्पर्धकांचा कस अजमाविणार आहेत. नाशिक येथील प्राथमिक फेरीचे उद्घाटन मंगळवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘पाठवण’ या एकांकिकेने स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर सिन्नर येथील ब. ना. सारडा महाविद्यालयाची ‘चार भिंती एक छप्पर’, मनमाड महाविद्यालयाची ‘बाबा तडतडी’ या एकांकिका सादर होतील.
दुपार सत्रात वणी महाविद्यालयाची ‘कॉलेज कट्टा’, देवळा महाविद्यालयाचीे ‘टाईमपास’, नाशिकच्या विधी महाविद्यालयाची ‘इटर्नल टूूथ’ या एकांकिका होतील. बुधवारी सकाळी सिन्नर येथील गु.मा.दां. महाविद्यालयाची ‘खरा जाणता राजा’, नाशिक येथील क. का. वाघ महाविद्यालयाची ‘हे राम’, त्र्यंबक महाविद्यालयाची ‘प्रायश्चित’ या एकांकिका होतील. समारोप सत्रात सिन्नर येथील भिकुसा महाविद्यालय ‘जाणीव’, पंचवटी महाविद्यालय ‘तहान’, नाशिकचे क. थो. हि. मु. महाविद्यालय ‘हाईड अ‍ॅण्ड सीक’ या एकांकिका सादर करणार आहेत. स्पर्धेचे टॅलंट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शन्सचे प्रतिनिधी युवा गुणांची पारख करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील कलागुणांचा संगम या स्पर्धेत पाहावयास मिळणार आहे.