22 September 2019

News Flash

कोकण मार्गावरील वेळापत्रक सुरळीत ठेवण्याचे आव्हान

यंदा गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर २१० विशेष फेऱ्या

यंदा गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर २१० विशेष फेऱ्या; ६४७ अतिरिक्त डबे, सुरक्षेसाठी २०४ रेल्वे सुरक्षा दल व होमगार्ड सज्ज

यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुकर होण्यासाठी २१० विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. मोठय़ा प्रमाणात धावणाऱ्या विशेष फेऱ्या आणि नियमित गाडय़ांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक सुरळीत ठेवण्याचे आव्हान असेल. विशेष फेऱ्यांव्यतिरिक्त मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर गाडय़ांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडले असून दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला ३० ऑगस्टपासून थांबा देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळेल.

दर वर्षीप्रमाणे यंदाही मध्य रेल्वे, कोकण आणि पश्चिम रेल्वेने नियमित गाडय़ांबरोबरच विशेष गाडय़ांचे नियोजन केले आहे. कोकण आणि त्यामार्गे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, वातानुकूलित डबल डेकर, कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, गरीब रथ, दादर आणि दिवा येथून सावंतावाडीसाठी पॅसेंजर गाडय़ा याशिवाय अन्य बऱ्याच नियमित गाडय़ा धावतात. गणेशोत्सवात विशेष फेऱ्या सोडल्यानंतर कोकण मार्गावरील सर्वच गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडते. त्यामुळे प्रवास बराच लांबतो. कोकण मार्गावर दुहेरीकरणाचे काम अद्यापही सुरू असून त्यामुळे गणेशोत्सवात गाडय़ांचे वेळापत्रक सुरळीत ठेवण्याचे आव्हान असेल.

या वेळी कोकण मार्गावर विशेष फेऱ्या आणि अतिरिक्त फेऱ्यांमुळे ७ लाखांहून अधिक प्रवाशांना त्याचा लाभ होईल, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली. जादा तिकीट खिडक्यांचीही सुविधा दिली असून ११ टपाल खात्यात, १७ रेल्वे स्थानक आणि १६ ठिकाणी शहर आरक्षण केंद्र सुरू केले आहे.

खेड, कणकवली आणि कुडाळ स्थानकात प्रथमोपचार सुविधा देतानाच चिपळूण, रत्नागिरी, थिविम, मडगाव, कारवार, उडुपी स्थानकात २ सप्टेंबर ते १२ सप्टेंबपर्यंत आरोग्य कक्ष उभारले जाईल.

सुरक्षेसाठी २०४ रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, होमगार्ड बरोबरच विशेष सुरक्षा दलाचे जवानही कार्यरत असतील. गणेशोत्सवकाळात अनधिकृतपणे तिकिटांची विक्री होऊ नये यासाठी दलालांना आळा घालण्यासाठीही विशेष कारवाई हाती घेण्यात येणार आहे.

First Published on August 26, 2019 1:05 am

Web Title: konkan railway timetable mpg 94