मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात कोसळलेली दरड आज पहाटे ३ वाजता हटवण्यात आली. मात्र घाटात दुसऱ्या ठिकाणी पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. आता ही दरड पुन्हा एकदा हटवण्यात आली असून महामार्गावरची वाहतूक सुरु करण्यात आली आहे.  रोहा, नागोठणे आणि महाड या ठिकाणी रात्रभर पूरस्थिती कायम आहे. दरड हटवण्यासाठी दोन तासांचा अवधी लागेल असेही सांगण्यात आले होते. आता ही दरड हटवण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर चोळई या ठिकाणीही दरड कोसळली होती. ही दरडही हटवण्यात आली आहे.

दरम्यान नागोठणे बाजारपेठेत तीन ते साडेतीन फूट पाणी शिरले होते. विशाल मेडिकल, कोळीवाडा आणि मोहल्ला भागातही पुराचे पाणी शिरले. महाडामध्येही सखल भागात पाणी शिरले आहे. मागच्या आठवड्यातही या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त होते.

गेल्या आठवड्यातही रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं. जिल्ह्य़ातील सर्व नद्या दुथडी भरून वाहात असल्याने महाड, नागोठणे, रोहा, नेरळ परिसराला पुराचा तडाखा बसला. रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. कोकण रेल्वेचीही सेवा विस्कळीत झाली होती. आता आज पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी घाटात दरड कोसळली. ही दरड आता हटवण्यात आली आहे.