स्थलांतरित मजुरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत आपण सुमारे १६ लाख मजुरांना आपण रेल्वे आणि बसच्या माध्यमातून इतर राज्यांमध्ये सोडलं आहे. साधारणतः ८०० ट्रेन्समधून ११ लाखांपेक्षा जास्त मजुरांना परराज्यात सोडण्यात आलं आहे. मी आज पियूष गोयल यांना धन्यवाद देतो आहे. गेल्यावेळी त्यांना बोललो होतो तर थोडासा त्यांना राग आला होता. असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी आज महाराष्ट्राशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पियूषजी मी आज तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो. त्यावेळी तुम्ही ते मनावर घेतलं आणि आम्हाला ट्रेन्स उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळे ११ लाख मजूर परराज्यात जाऊ शकले असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.४२ हजार बसेसच्या माध्यमातून आपण सव्वापाच लाख मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडलं आहे. या सगळ्यावर मुख्यमंत्री सहायता निधीतून जवळपास ८५ ते ९० कोटी रुपये खर्च केले आहेत असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?

लॉकडाउन करणं हे सायन्स असेल तर लॉकडाउन उघडणं हे एक आर्ट आहे. पावसाळा येतो आहे. पाऊस पडला की शेवाळ साठतं. त्या शेवाळावरुन आपला पाय घसरु नये म्हणून काळजी घेतो. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार आहे. गेल्या आठवड्यात मी संपूर्ण यंत्रणेची बैठक घेतली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. करोनासोबत जगायला शिका हे आपण सगळ्यांकडून ऐकतो आहोत. ते जगायचं म्हणजे काय? तर मास्क लावणं हे अपरिहार्य आहे. तसेच शिस्त ही प्रत्येकाने पाळायचीच आहे. बाहेर जाऊन आल्यानंतर हँडवॉशने हात धुणं, सॅनेटायझर वापरणं या सगळ्या गोष्टी वापरा. शक्यतो ६५ वर्षे वयाच्या वरील असलेल्या लोकांनी बाहेर पडू नये असं आवाहन मी तुम्हाला करतो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.