नागपूर : लोक कायदा हातात घेऊन हत्याकांड घडवून आणत आहे. धुळे आणि मालेगावमधील हत्याकांडावरून राज्यातील कायदा आणि सुवस्था किती बिघडली आहे. याचा प्रत्यय येतो, असे सांगून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर तोफ डागली.

चव्हाण हे नागपूरच्या विधान भवन परिसरातील काँग्रेसच्या कार्यालयात आले होते. विधान परिषदेची निवडणूक आहे. त्यासाठी उद्या गुरुवारपासून अर्ज भरण्यात येत आहे. काँग्रेसचे शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा उद्या अर्ज भरणार आहेत. त्याआधी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील कायदा-सुवस्थेच्या प्रश्नावरून फडणवीस सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांचे गृहशहर नागपूर आहे. राज्याच्या उपराजधानी शहरात १०० दिवसांत ६३ खून झाले आहे. हे खुनाचे सत्र बघितल्यास मुख्यमंत्री आपल्या शहरातील गुन्हेगारी रोखू शकलेले नाही, हे स्पष्ट होते.  पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. एवढेच नव्हे तर राज्याची राजधानी मुंबई देखील गुन्हेगारी वाढली आहे. धुळे आणि मालेगाव येथील हत्याकांड हे सर्व बघता राज्यात कायदा-सुवस्था पुरती ढासळल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सासंदीय मंडळाची बैठक पार पडली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

पावसाळी अधिवेशनात पीककर्ज वाटप आणि राज्यातील कायदा-सुवस्था हे मुद्दे प्रामुख्याने लावून धरण्यात येतील. हंगामाला सुरुवात झाली, पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ आली आहे, परंतु खरीप पीककर्ज वाटपात गती आली नाही. आतापर्यंत केवळ १८ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.