दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप जाहीर झालं. नागपूरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं खातवाटप करण्यात आलं आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा असून, ते हिवाळी अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे. यात तिन्ही पक्षातील काही नेत्यांची नावे स्पर्धेत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. पण, सरकार स्थापन झाल्यानंतरही खातेवाटपाचा निर्णय लांबणीवर पडला होता. अखेर ठाकरे सरकारचं खातेवाटप झालं असून, गृहखातं आणि नगरविकास ही दोन्ही खाती शिवसेनेला मिळाली आहेत. या दोन्ही खात्यांचा कारभार एकनाथ शिंदे पाहणार आहेत. तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग, उच्च तंत्र शिक्षण या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय ही खाती असणार आहेत. तर अपेक्षेप्रमाणे जयंत पाटील यांच्याकडे अर्थ नियोजन, गृहनिर्माण आणि सार्वजनिक आरोग्य या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, तर बाळासाहेब थोरात हे महसूल, उर्जा खातं साभाळणार आहेत.

महाविकास आघाडीच्या खातेवाटपाबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून, त्यात तिन्ही पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची नावे चर्चेत आहते. विशेष म्हणजे राज्याच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांचीही वर्णी लागू शकते.

तिन्ही पक्षातील ‘हे’ नेते आहेत स्पर्धेत

शिवसेना –
दिवाकर रावते, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील.

राष्ट्रवादी –
धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे.

काँग्रेस –

अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सतेज पाटील आणि सुनील केदार.