-मंदार लोहोकरे

देशभरासह राज्यात एकीकडे लॉकडाउनचे निर्बंध उठवले जात असताना, दुसरीकडे पंढरपूर येथे सहा दिवसांसाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पंढरपूर आणि शेजारील काही गावांमध्ये ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान पूर्ण लॉकडाउन  लागू केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. या अगोदर आषाढीवारी दरम्यान ३ दिवसांची संचारबंदी लागू केली होती.

पंढरपूर शहरातील करोना प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण संचारबंदी केली जावी, अशी मागणी होत होती यानुसार ७ ते १३ ऑगस्ट या कालावधीत लॉकडाउन लागू करण्यात येत आहे. लॉकडआउनच्या कालावधीत पंढरपूर शहरातील मंदीर परिसर, प्रदक्षिणा मार्ग या परिसरात व्यापक प्रमाणावर रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात येणार आहेत. सात दिवसात कोरोना संसर्ग रोखण्यात कितपत यश येते, याचा आढावा घेऊन संचारबंदीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल’असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा- राज्यात २४ तासांत २३१ पोलीस करोना पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

बार्शी, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी प्रत्येकी २००० रॅपिड अँटिजेन टेस्टच्या किट उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. जिल्हाभरात ४ लाख ६८ हजार कोमॉर्बिड नागरिक असल्याचे सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे.यापैकी संशयित व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठी चाळीस हजार किट उपलब्ध करण्यात येणार आहेत,अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, पंढरपूर येथे लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.पंढरपूर वगळता जिल्ह्यात इतरत्र लग्नसमारंभ, अंत्यविधी आदीसाठी नियमांचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. करोनाची साखळी तोडण्याचे आवाहन प्रशासनापुढे राहणार आहे.