जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीच केंद्र सरकारने बोलणी करावी. तशी चर्चा घडवून आणण्यासाठी कोणी दूरध्वनी केला तर त्यासाठी मध्यस्थी करू, अशी भूमिका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केली. मात्र, या प्रकल्पास शिवसेनेचा विरोध असल्याचे सांगत, अजून या सरकारला शिवसेनेच्या आंदोलनाचा हिसका माहीत नाही, असेही ते म्हणाले. औरंगाबाद येथे शिवसेनेच्या ३१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
अणुऊर्जा प्रकल्पाबाबत पर्यावरणमंत्री रामदास कदम व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे या प्रश्नी शिवसेनेची भूमिका काहीशी मवाळ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, की जैतापूरप्रश्नी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा भूमिका मांडली, तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे. जैतापूरच्या जनतेचा विरोध असल्याने तेव्हा नेत्यांनी घेतलेली भूमिका आजही कायम आहे. जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पास शिवसेनेचा विरोध आहेच, मात्र या अनुषंगाने चर्चा होऊ शकते. शिवसेनेने पूर्वी अगदी मुस्लीम लीग आणि करुणानिधी यांच्याशीही चर्चा केली आहे. त्यामुळे चर्चा करता येईल. याचा अर्थ शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध आहेच. आजही तीच भूमिका आहे. चच्रेअंती सरकारने अनेक प्रश्नी माघार घेतली असल्याची अनेक उदाहरणे असल्याचेही जोशी म्हणाले. शिवसेनेच्या आंदोलनाचा हिसका अजून या सरकारला माहीत नाही, असेही ते म्हणाले. या प्रश्नी आंदोलनाचा हिसका दाखवण्याच्या मानसिकतेत शिवसेना आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, की आंदोलन हे हत्यार असते. त्याने सरकार नमवणे कठीण नसते.
‘निष्ठा बदलणारे प्रभू’!
पदे मिळाली की निष्ठा बदणारे अनेक जण असतात. या पक्षातून त्या पक्षात उडी मारतात. आमच्याकडे असे नेते होऊन गेले. पदेही सन्मानाने मिळायला हवीत. मात्र, केंद्रीय मंत्रिपद मिळाले म्हणून सुरेश प्रभूही गेले. अशी निष्ठा बदलायची नसते, असे सांगत जोशी यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यावर टीका केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2015 1:50 am