औरंगाबाद : प्रभाव असणाऱ्या दोन मतदारसंघांपैकी ‘सुरक्षित’ता वाढावी या रस्सीखेचातून मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन अर्थात एमआयएम या पक्षात सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे. आमदार इम्तियाज जलील यांना विरोधही केला जात असून महापालिकेतील बहुतांश निर्णयामध्ये त्यांचे मत डावलले जात असल्याचे दिसून आले आहे. यातूनच महापालिकेत वेगवेगळ्या कारणांमुळे गोंधळ घातला जातो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर श्रद्धांजलीस विरोध करणे ही घटनाही पक्षांतर्गत कुरघोडीचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. एमआयएमच्या काही नगरसेवकांना अन्य पक्षातील नेते ‘हाताळत’ आहेत, असा आरोप आमदार इम्तियाज जलील यांनीही केला. एमआयएममध्ये पक्षीय पातळीवर एकी नसल्यामुळे नाराजी वाढलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमआयएम हा आक्रमक पक्ष. ही आक्रमकता किती टोकाची?- ‘उन्हू कौन है जी?’ अ‍ॅड. ओवेसी भाषणादरम्यान काहीसे विसरल्यासारखे भासवत होते. विधानसभा निवडणुकीत तेव्हा काँग्रेसचे राजेंद्र दर्डा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तर या मतदारसंघातून डॉ. गफार कादरी एमआयएमचे उमेदवार होते. जाहीर सभेत त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला खालून उत्तर आले ‘खरगोश’. तो शब्द ऐकल्यासारखे करत औवेसी म्हणाले, ‘क्या बोले, खरगोश?- तो काट के खाओ जी.’ त्यांच्या या वाक्यावर समर्थक तरुण उसळले. मात्र, पूर्व मतदारसंघात एमआयएमला विजय मिळविता आला नाही. तरीही या मतदारसंघात गफार कादरी यांनी ६० हजार २६८ मते मिळविली होती. भाजपचे उमेदवार अतुल सावे निवडून आले. पण आजही एमआयएमचे राजकारण करणाऱ्या बहुतेक धुरिणांनी औरंगाबाद मध्य मतदारसंघापेक्षा औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ अधिक सुरक्षित वाटतो. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून इम्तियाज जलील निवडून आले असले तरी त्यात त्यांच्या विजयापेक्षा भाजप-सेनेतील मतविभागणीची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. औरंगाबाद मध्य मतदारसंघात तेव्हा भाजपच्या किशनचंद तनवाणी यांना ४० हजार ७७० मते मिळाली होती आणि शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना ४१ हजार ८०० मते मिळाली होती. तुलनेने औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार कला ओझा यांना केवळ ११ हजार ४०९ मते मिळाली. या मतदारसंघात सेनेला उमेदवार नव्हता. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या आग्रहास्तव माजी महापौर कला ओझा यांना सेनेने उमेदवारी दिली. त्या चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या होत्या. या राजकीय पाश्र्वभूमीवर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारीऐवजी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी मिळाली तर अधिक सुरक्षित राहू, असे आमदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांना वाटते. त्यामुळे  एमआयएममध्ये सुंदोपसुंदी आहे. त्याचे परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होत आहे.

मतांचे ध्रुवीकरण हा औरंगाबादमधील नेत्यांचा आवडता विषय आहे. त्यामुळेच शिवसेनेचे नेते एमआयएमच्या नेत्याचे जाहीर बैठकीमध्ये कौतुकही करतात. सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी महिलांचे रुग्णालय व्हावे म्हणून आमदार जलील यांनी कसा पाठपुरावा केला, हे भरसभेत सांगितले. त्यांचे कौतुक झाले. तत्पूर्वी पालकमंत्री रामदास कदम जेव्हा औरंगाबादेत येत तेव्हा आमदार इम्तियाज जलील आवर्जून भेटायचे. त्यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे मंत्री खास वेळही राखून ठेवायचे. एकमेकांना सांभाळत, कुरवाळत एमआयएमच्या राजकारणाला आवश्यक ती रसदही पुरविली जाते. हवे तेव्हा वापरा असे सूत्र आहे. समांतर जलवाहिनीला एमआयएमचे आमदार जलील यांच्याकडून  केला जाणारा विरोध आणि महापालिकेतील त्यांचे पदाधिकारी यांच्या भूमिकांमध्येही विरोधाभास दिसून येते. सुरक्षित मतदारसंघाच्या काळजीतून एमआयएममधील वाढत असणारी सुंदोपसुंदी आणि महापालिकेत घडणाऱ्या घटनांचा सहसंबंध जोडला जात आहे.

* माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणे ही घटना पक्षांतर्गत कुरघोडीचा भाग असल्याचे सांगितले जाते.

* एमआयएमच्या काही नगरसेवकांना अन्य पक्षातील नेते ‘हाताळत’ आहेत, असा आरोप आमदार इम्तियाज जलील यांनीही केला.

* एमआयएममध्ये पक्षीय पातळीवर एकी नसल्यामुळे नाराजी वाढलेली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla imtiyaz jaleel neglected in mim
First published on: 22-08-2018 at 00:43 IST