टाळेबंदीमुळे बंद पडलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम पुन्हा एकदा सुरु होणार आहे. जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी आवश्यक असलेली महामार्गाची कामे तातडीने सुरु कऱण्याचे निर्देश संबधित यंत्रणांना दिले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप अशा दोन टप्प्यात हे काम केले जात आहे. टाळेबंदीमुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांना खीळ बसली होती. मात्र टाळेबंदीचा फायदा घेऊन मुंबई-पुणे दृतगती मार्गावरील अमृतांजन पूल नुकताच पाडण्यात आला. पुलाचे पाडण्याचे काम सुरुंग लावून पुर्ण करण्यात आले. या महामार्गावरील वाहनांची वर्दळ कमी असल्याने हे काम तातडीने पुर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच धर्तीवर आता मुंबई-गोवा महामार्गाचे कामही सुरु होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी, आणि महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत फेगडे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.