राज्यात सध्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. एकीकड दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधितांची वाढ होत असताना, दुसरीकडे आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र आहे. रूग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा निर्माण झालेला आहे. परिणामी रूग्णांचे हाल सुरू आहेत. तर, औषधी पुरवठ्याच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्षाचे मंत्री व भाजपा नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधल्याचे दिसत आहे. ”खुल्या बाजारात रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले टाकून राज्यांना मदत केली आहे. राज्याला संपूर्ण कोटा हा तर्काधारित असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रालाच झाला आहे. मविआच्या मंत्र्यांनी आता तरी राजकारण बंद करून केवळ दोषारोप करण्याचे काम बंद केले पाहिजे.” असं फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.

Coronavirus: “ताटात आहे तेवढंच देणार ना,” प्रवीण दरेकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये जुंपली

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटसोबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडओत दरेकर म्हणतात, ”राज्य सरकारने रेडमडेसिवीर संदर्भात पुन्हा एकदा केंद्राला दोष देण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी व महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न केला गेलेला आहे. मात्र वस्तुस्थिती आज मी सांगणार आहे. मुळात किती तुटवडा आहे? किती मागणी आहे? याबाबतच या सरकारमध्ये एकवाक्यता नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे ३६ हजार रेमडेसिवीरची मागणी असल्याचे सांगत असताना, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक हे ५० हजार रेमडेसिवीर हवे असल्याचे म्हणत आहेत. हे कमी म्हणून की काय शिवसेना नेते संजय राऊत ८० हजार रेमडेसिवीरची आवश्यकता असल्याचं म्हणत आहेत. तर, ज्याचं खातं आहे ते अन्न व औषध प्रशासन मंत्री काही बोलतच नाही. म्हणजे आकडेवारीत देखील यांची एकवाक्यता नाही. मला वाटतं जो दहा हजारांचा तुटवडा आहे, महाराष्ट्राला देशाते सगळ्यात जास्त रेमडेसिवीर केंद्रकाडून देण्यात आलेलं आहे.”

केंद्रावर खापर फोडणं अयोग्य, तुम्ही काय करताय ते सांगा – प्रवीण दरेकर

हे सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारवर टीका करण्याची चढाओढ राज्य सरकारच्या मंत्र्यामध्ये लागल्याचं दिसत आहे. असा देखील आरोप दरेकर यांनी केला आहे.