राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीवर तब्बल ९१ लाखांचा खर्च झाल्याचे जाहीर झाल्यानंतर आता कुलगुरू शोध समितीने खर्चाला कात्री लावून काटकसर सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. त्याचाच भाग म्हणून वर्धा येथील समितीच्या आधीच्या बैठकांबरोबरच उमेदवारांच्या मुलाखतीही गांधी भूमीतच घेण्याचे समितीने ठरवले आहे. महात्मा गांधींच्या शांत भूमीत राहण्याचे भाग्य उमेदवारांनाही मिळेल, असे जरी सांगितले जात असले तरी खर्चाचा आधीच बभ्रा झाल्याने त्यांनी आधीच्या दोन बैठका आणि उमेदवारांच्या मुलाखतीही वर्धा येथेच घेण्याचे ठरवले आहे.
जानेवारीत कुलगुरुपदासाठी दिलेल्या जाहिरातीवर तब्बल ९१ लाखांचा खर्च झाला. खर्चाची जबाबदारी न स्वीकारता खर्चाचा चेंडू समिती आणि विद्यापीठ एकमेकांवर टोलवीत होते. मात्र, सुमारे कोटींच्या घरातील खर्च सर्वाच्याच नजरेत आल्याने उमेदवारांच्या अर्जाच्या छाननीच्या दोन बैठका मुंबईला पंचतारांकित हॉटेलमध्ये न घेता त्या वध्र्यातच घेण्यात आल्या. एवढय़ा खर्चात विद्यापीठाला पाच कुलगुरू मिळाले असते, अशी विनोदी चर्चाही यानिमित्त करण्यात आली. समिती सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे समितीकडे तब्बल १२२ अर्ज देशाच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत. सूत्राच्या भाषेत सांगायचे तर ‘मुली पाहिलेल्या आहेत. फक्त टिळा लावायचा बाकी आहे.’ हे काम येत्या ४ व ५ एप्रिलला होऊ घातले आहे. समितीला एकूण १५ ते २० उमेदवारांची नावे मुलाखतीसाठी सुचवायची होती. कुलगुरू होण्यास अनेक जण इच्छुक होते. शिवाय, आपणच या पदासाठी अर्हताप्राप्त आहोत, असे पुन:पुन्हा सांगत होते. त्यांची नावे यातून गळाली असल्याने तब्बल १८ उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात येणार आहे. त्यापैकी काहींना पत्र, मेल आणि दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले आहे. त्यात नागपूर विद्यापीठातील सांख्यिकी विभागाचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ काणे आणि अमरावती विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागातील प्रा. डॉ. महेंद्रकुमार राय यांचा समावेश आहे. पत्र पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या ७० टक्के उमेदवार विदर्भातीलच आहेत. उर्वरितांमध्ये औरंगाबाद, मुंबई, जळगाव आणि नांदेडबरोबरच राज्याबाहेरचेही उमेदवार आहेत. आश्चर्य म्हणजे, त्यात एकही महिला उमेदवार नाही. त्यामुळे महिलांना म्हणून झुकते माप द्यावे, अशी अपेक्षा असलेल्या उमेदवारांना कुलगुरुपद आरक्षित नसल्याची चपराक समिती सूत्रांनी लगावली आहे. दरम्यान, कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, डॉ. मुरलीधर चांदेकर, डॉ. महेश येंकी, डॉ. के.सी. देशमुख, डॉ. प्रमोद येवले, डॉ. नरेंद्र गायकवाड, डॉ. अलका चतुर्वेदी, डॉ. नीलिमा देशमुख, डॉ. जोगेंद्र गवई, डॉ. प्रदीप कुंडल आदींना अद्याप समितीचे निमंत्रण नाही.
समितीचा कारभार अतिशय पारदर्शीपणे सुरू असून कुणी आपल्यावर बोट ठेवू नये आणि तुल्यबळ उमेदवारच विद्यापीठाला मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. कुलगुरू शोध समितीचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. विकास शिरपूरकर असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे आणि महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थेचे संचालक डॉ. प्रफुल्लकुमार काळे सदस्य आहेत.