“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कसा प्रचार करतात, हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि यातील एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी पुन्हा त्या बंद घरात जातात. संध्याकाळीही ते घर बंद असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या घरात जातात, पण काहीही झालं तरी ते त्या घरातील सदस्यांशी संपर्क साधतातच. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला पटणार नाहीत पण जे चांगलं आहे ते घ्यायला हवं. ही चिकाटी आपल्या कार्यकर्त्यांनीही शिकावी,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपाला यश का मिळतं हे सांगताना संघाच्या या कार्यशैलीबाबत मला एका भाजपा खासदारानेच माहिती दिली होती, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

पिंपरी- चिंचवडमध्ये शरद पवार यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पदाधिकाऱ्यांनी आजपासून एक निर्णय घ्यावा, प्रत्येकाला जो भाग वाटून दिला आहे त्या भागातील नागरिकांशी संपर्क साधावा, घरोघरी भेट द्यावी. मतदारांकडून सविस्तर माहिती घ्यावी. यामुळे मतदार असं म्हणणार नाही की निवडणुकीतच तुम्हाला आमची आठवण येते का?, असे शरद पवारांनी सांगितले.

भाषणात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची पद्धत कशी असते हे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही याचे अनुकरण करावे, असा सल्ला दिला. पवार म्हणाले, भाजपाच्या एका खासदाराने मला संघाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली होती. संघाच्या एका स्वयंसेवकाला एखादा विभाग दिला आणि यादी दिली की तो पक्षाचे निवेदन घेऊन जातो.  एखादे घर बंद असेल तर ते वारंवार त्या घरात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधतात. पक्षाचं निवेदन प्रत्येकाच्या हाती पोहोचेल यावर ते भर देतात. असा शिस्तबद्ध कार्यकर्ता पक्षासाठी उपयुक्त असतो असे तो भाजपा खासदार सांगत होता. आपण यातून शिकलं पाहिजे, असे पवारांनी आवर्जून सांगितले.

संबंध देशाने पाहिले की देशाचे पंतप्रधान एका गुहेत जाऊन बसले होते. भगवे कपडे घालून ते सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत गुहेत जाऊन बसले. काय चाललंय,नव्या पिढीसमोर काय आदर्श ठेवताय. जग कुठं चाललंय..आधुनिकता काय सांगतं विज्ञान काय सांगतं आणि आम्ही गुहेत जाऊन बसतो, अशा शब्दात त्यांनी मोदींचा समाचार घेतला.