राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात जात आहेत. नेत्यांच्या भाजपा-शिवसेना पक्षप्रवेशावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मिश्किल ट्विट करत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावरून आव्हाडांनी टीका केली आहे. टीका करताना त्यांनी आपल्या ट्विटमध्ये एक विनोद केला आहे. त्यामध्ये त्यांनी मिश्किलमध्ये फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे म्हटले आहे.

काय आहे आव्हाडांचे ट्विट ?
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे केबिनमध्ये बोलत बसले होते. अचानक झंप्या तिथे कुतुहलाने बघायला गेला तिथे उदयनराजे भोसले, भास्कर जाधव, गणेश नाईक, निंबाळकर, सचिन अहिर आणि इतरांना बघून तो ओरडत बाहेर आला आणि म्हणून लागला मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला….”

भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर शनिवारी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीमध्ये अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर आव्हाड यांनी मिश्किल ट्विट करत भाजपावर तोफ डागली आहे.

राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते गणेश नाईक आणि उदयनराजे यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय इतर काही नेत्यांचा प्रवेश शिवसेना, भाजपात होण्याची शक्यता आहे. यात छगन भुजबळ, आमदार रामराजे निंबाळकर या नेत्यांचा समावेश आहे. याआधी शिवेंद्रराजे भोसले, सचिन अहिर, संदीप नाईक, राणाजगजीत सिंह, चित्रा वाघ, धनंजय महाडिक, दिलीप सोपल, मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड, विजयसिंग मोहिते पाटील यांचा मुलगा रणजीत सिंग मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.