राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा हटवण्यापूर्वी केंद्र सरकारकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असं सांगण्यात आलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी या मुद्द्यावरून भाजपावर हल्लाबोल करत सुरक्षा काढण्याचा घेतलेला निर्णय हा सुडबुद्धीनं घेतलेला निर्णय असल्याचं म्हटलं आहे.

“देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना किंवा कोणता नेता देशासाठी महत्त्वाचा आहे, त्यांना सरकारनं सुरक्षा पुरवणं आवश्यक आहे. सुडबुद्धीनं सुरक्षा हटवण्यासारखा निर्णय घेणं अयोग्य आहे,” असं रोहित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसतानाही त्यांना सुरक्षा देण्यात आली असल्याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणावरही आपलं मत व्यक्त केलं. “फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्यांचा कोणाचा यामध्ये सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे प्रकार घडत असतील तर यापुढे सर्वसामान्यांचेही फोन केले जाऊ शकतात. यावर चाप लावणं आवश्यक आहे. सरकार त्या दृष्टीनं नक्कीच प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे,” असंही ते म्हणाले.

“केंद्र सरकारने जाणुनबुजून शरद पवारांची सुरक्षा कमी केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सुरक्षा काढली म्हणून शरद पवार घराबाहेर पडणार नाहीत का ?” असा सवालही त्यांनी केला आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान तैनात होते. मात्र २० जानेवारीपासून ही सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा काढण्याआधी कोणताही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती अशी माहिती शरद पवारांच्या दिल्लीमधील कार्यालयाकडून देण्यात आली.

आणखी वाचा – मोदी सरकारने हटवली शरद पवारांची सुरक्षा

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) व्यक्तींना सुरक्षा पुरवली जाते. त्यामुळे शरद पवार यांच्या दिल्लीमधील निवासस्थान ‘सहा जनपथ’ येथे दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेवरील ताण तसंच आंदोलनं लक्षात घेता हा निर्णय केंद्र सरकारने घेतला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र त्याची कल्पना संबंधित व्यक्तीला देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यानंतर केंद्र सरकारने जाणुनबुजून सुरक्षा हटवली असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्याही एसपीजी सुरक्षेत बदल करण्यात आला होता.