News Flash

विलीनीकरण केल्यास ‘राष्ट्रवादी’चीच अडचण ; पक्षाने शक्यता फेटाळली

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चेत अजिबात तथ्य नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई : शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली असली तरी विलीनीकरण राष्ट्रवादीला राजकीयदृष्टय़ा अडचणीचे ठरणारे आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीने विलीनीकरणाची शक्यताही फेटाळून लावली आहे.

लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसला तीन जागा कमी पडत आहेत. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन झाल्यास राष्ट्रवादीच्या पाच खासदारांच्या बळावर काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करू शकतो. या बदल्यात राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद पवारांकडे सोपविले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाची चर्चा अनेक वर्षे सुरू आहे. दिग्विजय सिंग यांनीही विलीनीकरणाचा सल्ला पवारांना दिला होता. काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांनीही तसे मतप्रदर्शन केले होते.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पार वाताहात झाली. लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. काँग्रेसचा जनाधार आटला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसशी जुळवून घेऊन राष्ट्रवादीचा काहीही फायदा होणार नाही. उलट नुकसानच होईल. त्यातच शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात परस्परांबद्दल संशयाची भावना आहे. उभयतांची नेहमी भेट होत असली तरी त्यांचे सूर फारसे जुळलेले नाहीत. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास पुन्हा गांधी घराण्याचे वर्चस्व पवारांना मान्य करावे लागेल.

सध्या भाजपला चांगला जनाधार आहे. या पाश्र्वभूमीवर भाजप नेत्यांची नाराजी ओढवून घेण्याची कृती पवार सध्याच्या परिस्थितीत तरी करण्याची शक्यता कमीच आहे. राष्ट्रवादीचे अस्तित्व संपुष्टात आणून काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याची चूकही पवार आता तरी करणार नाहीत. कारण राष्ट्रवादीचे वेगळे अस्तित्व राखणे हेच पवारांसाठी महत्त्वाचे आहे.

विलीनीकरणाची चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीने त्याचा इन्कार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चेत अजिबात तथ्य नाही. पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीत राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली. त्यात विलीनीकरणाचा कोणताही मुद्दा नव्हता, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

नेत्यांची आज बैठक

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शनिवारी मुंबईत बैठक होत आहे. पक्षाचे नेते, खासदार-आमदार, पराभूत उमेदवारांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगल्या यशाची अपेक्षा होती, पण अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 2:58 am

Web Title: ncp party refuses possibility of merger with congress party
Next Stories
1 चारा छावण्या चालकांच्या दबावापुढे सरकार नमले
2 ‘वैद्यकीय’च्या ५२० जागा वाढविण्याचा प्रस्ताव
3 सोलापूर-माढय़ात भाजपचे ‘कमळ’ फुलल्याने काँग्रेस आघाडी चिंताग्रस्त
Just Now!
X