गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून देशभरात करोनाचं थैमान सुरू आहे. या काळात लॉकडाउन आणि उद्योगधंदे बंद पडल्यामुळे देशावर आर्थिक संकट देखील ओढवलं. महाराष्ट्रात देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे. सध्या राज्यात १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउन लागू असल्यामुळे पुन्हा एकदा उद्योगधंदे आणि लोकांचे रोजगार संकटात सापडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच एक मागणी केली आहे. करोनाच्या काळात सामान्यांना दिलासा मिळावा आणि आर्थिक संकटात काहीसा दिलासा मिळावा, अशी अपेक्षा या मागणीद्वारे सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान कार्यालयाला टॅग करून ट्वीट केलं आहे. “देशभरात करोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत जनतेची क्रयशक्ती देखील घटली असून अनेक कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. या परिस्थितीतही स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडरचे दर ८०० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. अनेकांना ही रक्कम परवडत नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत”, असं सुप्रिया सुळेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

“बहुतांश घटक त्रस्त आहेत!”

सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे जनता त्रस्त असल्याचं सुप्रिया सुळेंनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “समाजातील बहुतांश घटक गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त आहेत. आपणास नम्र विनंती आहे की किमान करोना काळात तरी जनतेची आर्थिक स्थिती लक्षात घेता कृपया गॅसच्या किंमती सर्वसामान्यांना परवडतील अशा पद्धतीने कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करावा. अवश्य यावर विचार करून सर्वसामान्यांना दिलासा द्याल, हा विश्वास आहे. धन्यवाद”, असं सुप्रिया सुळे या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.

 

ऐन करोनाच्या संकटकाळात आरोग्य विभागात मेगाभरती! १६ हजार पदांसाठी निवडप्रक्रिया होणार!

काय सांगते राज्यातली आकडेवारी?

महाराष्ट्रात रोज आढळणाऱ्या करोना रुग्णांचा आकडा जरी काहीसा घटला असला, तरी मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात ५७ हजार ६४० नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ इतकी झाली आहे. यापैकी ६ लाख ४१ हजार ५९६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसरीकडे राज्यात दिवसभरात तब्बल ९२० करोनाबाधितांचा मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ७२ हजार ६६२ इतका झाला आहे. त्यासोबत राज्याचा मृत्यूदर १.४९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.