यवतमाळ जिल्ह्य़ातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या युक्तयांचा वापर करून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश तातडीने जारी करावे, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. हे गैरप्रकार हे प्रामुख्याने घाटंजी व पांढरकवडा या तालुक्यात घडले असून, त्यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’त प्रकाशित झाले.
या प्रकरणांबाबत सविस्तर तपशील रोहयो मंत्र्यांना आमदार गोऱ्हे यांनी देऊन म्हटले आहे, की मृत व्यक्तींना कामावर दाखवून रोहयोतील हजारो रुपये अदा करणे व ऑनलाईन मस्टरवर त्यांचे नाव असले तरी हस्तलिखित मस्टरवरून ते गायब करणे, तसेच प्रत्यक्ष काम न केलेल्या महिलांनाही कामाचे पैसे अदा करण्यात आलेले आहेत. या सर्व महिला मजुरांची खाती मोहदा येथील टपाल कार्यालयात उघडण्यात आली; परंतु ऑनलाईन मस्टरमध्ये त्याचा कुठेच उल्लेख नाही.
यापैकी मीरा किनाके या महिलेच्या नावावर काढण्यात आलेली ५४२४ रुपयांची रक्कम टपाल खात्याच्या माध्यमातून चौकशी झाल्यानंतर संबंधित पोस्टमास्तरकडून वसूलही करण्यात आल्याचेही समजते. याबाबतचे लेखी पुरावे हाती लागल्याचा दावा संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. ज्याअर्थी हे लेखी पुरावे हाती आले आहेत त्याअर्थी या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना अटक करून कार्यवाही होणे आवश्यक होते; परंतु असे न होता शासकीय स्तरावर दिरंगाई होत आहे.
ही बाब योग्य नाही. तरी या संदर्भातील गांभीर्य तातडीने लक्षात घेऊन विनाविलंब चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावे, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली आहे.