लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : आता तंत्रज्ञानाचा उपयोग करून विकासात्मक पावले उचलावी लागणार आहेत. त्यासाठी मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीचा अंगिकार करायला हवा. आत्मनिर्भर भारत बनवितांना ही मूल्य अत्यंत महत्त्वाची आहेत. भौतिक विकासाबरोबर मूल्याधिष्ठित संस्कार महत्त्वपूर्ण आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

स्व.शंकरलाल खंडेलवाल जन्मशताब्दी वर्षाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जितेंद्रनाथ महाराज, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते. यावेळी अतुल गणात्रा, रवी भुसारी, गोपाल खंडेलवाल, नरेंद्र देशपांडे, तारा हातवळणे, महेंद्र कवीश्वार, रेखा खंडेलवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूरवरून दूरचित्र संवादाच्या माध्यमातून सहभागी होत नितीन गडकरींनी ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर संबोधित केले.

पुढे ते म्हणाले, भारत आत्मनिर्भर झाल्याशिवाय गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी मिटणार नाही. आजवर अनेक संकटे आली. त्यावर जशी यशस्वीपणे मात केली, त्याच पद्धतीने करोनावर देखील मात करू. आपल्याला खूप मोठी आर्थिक लढाई जिंकायची आहे. सक्षम भारत निर्माण करण्याचे आपले ध्येय आहे. इमानदारी, सचोटी, सत्यनिष्ठता, नम्रता, विश्वासनीयता ही मुल्ये आपल्याला अंगिकारावे लागतील. स्व.शंकरलाल खंडेलवाल नेहमी सर्वसामान्य माणूस, समाज व राष्ट्र सुखी कसे होईल यासाठी झटत होते. प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भारताच्या विविध प्रांतातून दूरचित्र संवादाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या अनेक विद्यााथ्र्यांनी प्रश्न विचारून थेट नितीन गडकरींशी संवाद साधला.

कार्यक्रमात जितेंद्रनाथ महाराज यांनी स्व.शंकरलाल खंडेलवाल यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेऊन त्यांच्यासोबतचे अनुभव कथन केले. संजय धोत्रे यांनी स्व.शंकरलाल खंडेलवाल यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डिंपल मापारी यांनी, तर आभार प्रदर्शन गोपाल खंडेलवाल यांनी केले.