राज्यात सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झालेला आहे. मात्र अद्यापतरी राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख यांची पाठराखण सुरू असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका विधानावरून, आता भाजपा नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे.

“ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?”, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलेला आहे. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.

देशमुख क्वारंटाईनमध्ये होते, तर मग ‘हे’ नेमके कोण आहेत?; फडणवीसांचा पवारांना सवाल

“अनिल देशमुखांना वाचवायचचं, असा निर्णय राष्ट्रवादीने घेतलेला दिसतोय!१५ फेब्रुवारीला देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली होती, क्वारंटाईन काळात घेता येते ? कितीही झाकलं तरी सत्य लपणार नाही! “ये पब्लिक है, ये सब जानती है!” असं दरेकर यांनी ट्विट केलं आहे.

“…म्हणून विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीला आधार नाही”, शरद पवारांनी पुन्हा केली गृहमंत्र्यांची पाठराखण!

आपल्या ट्विटसोबत दरेकर यांनी अनिल देशमुख यांचं १५ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकारपरिषदेचं ट्विट देखील जोडलं आहे. तसेच, ”खरंच….स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार आहात? थोडा त्यांच्या ज्येष्ठतेचा तरी विचार करा!” असं देखील दरेकर यांनी ट्विट केलं आहे.

”केवळ अनिल देशमुख यांचा प्रश्न नाही, ते राज्याचे गृहमंत्री आहेत. परंतु राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असताना खासदार संजय राऊत बेताल वक्तव्य करत आहेत.” असं देखील दरेकर म्हणालेले आहेत.