एकनाथ खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर असलेली आपली नाराजी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवली. आपल्याविरोधात खालच्या पातळीवर राजकारण करण्याचा प्रयत्न झाला असं म्हणत खडसेंनी फडणवीसांवर आरोप केले. खडसेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणीवस यांनी, खडसे जे सांगतायत ते अर्धसत्य आहे. योग्य वेळ येताच मी आपली बाजू मांडेन असं म्हटलं. खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर भाजपामधील अन्य नाराज उमेदवारांनाही गळ घालण्याचे प्रयत्न सुरु झाले.

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्रीपद भूषवणाऱ्या पंकजा मुंडे यांना शिवसेना पक्षप्रवेशाची ऑफर दिली. यावरुन फडणवीसांनी खोतकर यांची खिल्ली उडवली आहे. पंकजा मुंडेंना ऑफर देणाऱ्या खोतकरांना विचारतंय कोण?? ते कसली ऑफर देतायत, त्यांची अवस्था काय आहे?? ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी काम केलंय…पण त्यांना विचारतंय कोण??, असं म्हणत फडणवीसांनी औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खोतकरांची खिल्ली उडवली.

पक्षातून बाहेर पडत असताना खडसेंना कोणालातरी व्हिलन बनवण्याची गरज आहे. त्यामुळे ते मला व्हिलन बनवत आहेत, असं म्हणत फडणवीसांनी खडसेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यास नकार दिला.