पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनासारखं राष्ट्रीय संकट देशावर कोसळलेलं असताना PM Cares या नावाने फंड सुरु करुन सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ट्विट करुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. जवाहरलाल नेहरु यांनी जानेवारी १९४८ मध्ये राष्टीय सहाय्यता निधी अर्थात PM National Relief Fund स्थापन केला. त्यानंतर एकाही पंतप्रधानांनी नवा राष्ट्रीय निधी स्थापण्याची गरज वाटली नाही. मात्र PM Cares Fund सुरु करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही असं चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मंगळवारीच इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही याबद्दल प्रश्न विचारले होते. एक पंतप्रधान राष्ट्रीय निधी असताना PM cares fund ची गरजच काय? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. तसेच शशी थरुर यांनीही याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. आता पृथ्वीराज चव्हाण यांनीही हाच प्रश्न उपस्थित करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

करोना व्हायरसच्या लढाईविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM Cares Fund स्थापन केला. २८ मार्च रोजी त्यांनी याची घोषणा केली. यानंतर उद्योजक, खेळाडू, कलाकार यांनी या फंडसाठी मोठी मदत केली आहे. अशात या फंडवर काँग्रेसकडून सातत्याने टीका होताना दिसते आहे.