प्रदूषण तपासणीसाठी तारापुरात विशेष पथक; राज्यभरातील ३४ अधिकाऱ्यांची नियुक्ती

तारापूरमधील स्थानिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषणकारी कारखान्यांवर दुर्लक्ष केल्याने प्रदूषणकारी कारखान्यांची तपासणी करण्यासाठी राज्यभरातील अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. अनेक दिवस चालणाऱ्या या तपासणीमध्ये कारखान्यातील त्रुटी, वायुप्रदूषण, रासायनिक सांडपाणी याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. असे असले तरी प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य सचिव ई. रवींद्रन यांनी औद्योगिक क्षेत्राची पाहणी केली होती. मात्र त्यांची पाठ फिरताच पुन्हा वायुप्रदूषण दुसऱ्या दिवशीच मोठय़ा प्रमाणात वाढलेले दिसले. बुधवारी सकाळी तारापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची लगबग पाहायला मिळाली.

औरंगाबाद, मुंबई, ठाणे व पुणे येथील उपप्रादेशिक अधिकारी आणि क्षेत्र अधिकारी अशा ३४ अधिकाऱ्यांची नियुक्ती तारापूरच्या कारखान्यांची तपासणी करण्यासाठी केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डी. बी. पाटील यांनी विविध अधिकाऱ्यांना विभागानुसार तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या २२ अधिकारी तारापूरमध्ये दाखल झाले असून इतर अधिकारी उशिरा येणार असल्याचे समजले. अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणाऱ्या कारखान्याला कोणत्याही उत्पादनाची परवानगी, वायुप्रदूषण, रासायनिक सांडपाणी सोडणे, वायुप्रदूषण तपासणी करण्यासाठी लावण्यात येणारी उपकरणे अशा अनेक गोष्टींची पाहणी करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तारापूरमध्ये प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढतच चालला होता. परिणामी तारापूर देशातील सर्वात जास्त प्रदूषणकारी ठरले. असे असले तरीही तारापूरमध्ये प्रदूषणाचा खेळ सुरूच होता. काही बडय़ा कारखानदारांना काही मंत्र्यांची साथ असल्याने कारखान्यांवर कारवाई होत नाही, असा आरोप नागरिकांनीही वारंवार केला. प्रदूषणात देशात पहिला नंबर पटकावलेल्या तारापूरची पाहणीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली नव्हती. यातच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मंत्र्यांच्या कचाटय़ातून सुटलेल्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाची टांगती तलवार पाहून तारापूरमधील प्रदूषणाची पाहणी केली होती. यानुसार आता काही दिवस तारापूरमध्ये प्रदूषणाची तपासणी होणार असल्याने नागरिकांना मोकळा श्वास मिळणार आहे.

दोन वर्षांपूर्वीही कारवाईचा फार्स

तारापूर औद्योगिक क्षेत्रात दोन वर्षांपूर्वीही दिवाळीच्या तोंडावर प्रदूषण करणाऱ्या ५० ते ६० कारखान्यांवर कारवाई करण्याचे सुचवण्यात आले होते. मात्र ऐन दिवाळीत कारखाना बंद झाल्याने कारखानदारांनी कामगारांचे बोनस व पगार दिले नाहीत. त्यामुळे पुन्हा काही अटींवर हे कारखाने सुरू करण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे यंदाही दिवाळीच्या तोंडावर कारखान्यांवर कारवाई केली जाणार की त्यांना मोकळीक देणार, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

ते’ अधिकारीच तपास करणार?

तारापूर औद्योगिक क्षेत्रांमधील प्रदूषणकारी कारखान्यांची राज्यभरातून आलेल्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार आहे. मात्र या वेळी स्थानिक अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचे दिसून येते. यातच महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्रातील साळवी केमिकल या प्रदूषणकारी कारखान्यावर कारवाईसाठी ज्या अधिकाऱ्यांनी चालढकल केली होती, तसेच कारखाना बंद ठेवा, असे तोंडी सांगणारे अधिकारी चांगलेच अडचणीत आले होते. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वैज्ञानिक अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. मात्र आता हेच प्रादेशिक अधिकारी तारापूरमधील कारखान्यांच्या तपासणीमध्ये सर्व अधिकाऱ्यांचे नेतृत्व  करणार आहे.

तारापूरमधील कारखान्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून सांडपाण्याचे नमुने घेतले जाणार आहेत. वायुप्रदूषणाबाबत विशेष पथक तपासणी करणार आहे. – डी. बी. पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी