22 February 2019

News Flash

एके 47 आली कुठून? मोहन भागवतांवर मोक्काअंतर्गत कारवार्इ करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रतिसैन्य कशासाठी उभारत आहे?

प्रकाश आंबेडकर (संग्रहित छायचित्र)

राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. या देशाचा कायदा कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही, मग संघाकडे एके 47 रायफल कशी आली, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीस सरकारला केला आहे. कोणाकडे शस्त्रे सापडली की त्याच्यावर अतिरेकी कायद्यांतर्गत कारवार्इ केली जाते. त्यानुसारच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही मोक्का अंतर्गत कारवार्इ करा. जर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जमा केलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला नाहीतर कोर्टात जाऊ आणि रस्त्यावर उतरून मोर्चा काढू असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल आणि वायूदल आहे. राज्यात संरक्षणासाठी पोलिस आहेत. मग संघ प्रतिसैन्य कशासाठी उभारत आहे? असा सवालही आंबेडकरांनी केला. ते म्हणाले, या प्रतिसैन्याकडे असलेली शस्त्रास्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली नाही तर महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केले जाईल. संघाच्या लोकांकडे शस्त्रास्त्रं सापडत आहेत. मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांचे एके 47 या रायफलसह फोटोही समोर आले आहेत. या देशाचा कायदा कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही. सामान्य माणूस पोलिसांच्या परवानगीने फक्त पिस्तूल वापरू शकतो. मग मोहन भागवत यांच्याकडे एके 47 रायफल कोठून आली. त्यांच्याविरोधात नागपूरमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. यावर सरकार कारवाई करणार आहे की नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या तक्रारीची चौकशी करावी, अशी मागणी आंबेडकरांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतका मोठा शस्त्रसाठा कसा आला, याचा शोध घेण्याची गरज आहे. परंतु, तो घेतला जात नाही. सरकार सध्या ऑक्सिजनवर असून चार राज्यांच्या निवडणुकानंतर ते व्हेंटिलेटरवर जार्इल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

भारिप बहुजन महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील अमरज्योत या ठिकाणी शांतता आंदोलन पुकारण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जमा केलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात यावा या मागणीसाठी शांतता आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते.

First Published on October 12, 2018 1:27 am

Web Title: prakash ambedkar demands to book rss chief mohan bhagwat under organised crime act for possessing weapons