पृथ्वीराज चव्हाण यांचे मत; भक्कम पुरावे असल्याचा दावा
एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे अपरिहार्य होते. त्यांच्याविरुद्ध सज्जड पुरावे आहेत. ते यातून बाहेर पडणे अशक्य असल्यानेच हा जर भाजपाने राजकीय निर्णय घेतला नसता तर, नजीकच्या काळात खडसे यांना न्यायालयाकडून मंत्रिपदावरून जावेच लागले असते अशी खडसेंच्या गच्छंतीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
दाऊद इब्राहिम व खडसे यांच्यातील कॉलसंदर्भातील आरोप अतिशय गंभीर असून, केवळ खडसेंना मंत्रिपदावरून हटवून हे प्रकरण इथेच थांबता कामा नये, राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असे हे प्रकरण असल्याने त्याची केंद्रीय स्तरावर सखोल चौकशी होताना, खडसे यांनाही आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली गेली पाहिजे. पण, या प्रकरणाची चौकशी न करणे आणि खडसे यांनी चुकीचे काहीच केलेले नाही, पण नैतिक कारणावरून आम्ही त्यांचा राजीनामा घेतला आहे, असे जर थातूरमातूर उत्तर भाजपाने दिले तर ते आम्ही कदापि मान्य करणार नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
खडसे यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे आहेत. नुसता राजीनामा देऊन बोंबाबोंब करायची, खडसेंची समजूत काढायची की, तुम्ही आत्ता राजीनामा द्या, लोकांच्या हे फार काळ लक्षात राहात नाही. आम्ही तुमचे पुनर्वसन करू अशी काही तरी तडजोड खडसेंच्या राजीनाम्यामागे झालेली आहे.
खरा मुद्दा आहे तो, खडसे यांनी सत्तेचा गैरवापर करून कोटय़वधी रुपयांची जमीन बळकावलेली आहे. ही जमीन फुकटात पदरात पाडायचा प्रयत्न त्यांनी केला. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झालेले आहे का, हे महत्त्वाचे असून, आमचा स्पष्ट आरोप आहे की भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झालेले आहे. या कायद्यांतर्गत खडसे यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे.
केंद्रीय नेतृत्वाने खडसे यांच्या हकालपट्टीचा निर्देश दिला असेल. पण, इथेच हे प्रकरण थांबता कामा नये, सखोल चौकशी व्हावी, दिशाभूल करणारी उत्तरे भाजपाने दिली तर ती आम्ही मान्य करणार नाही.
-पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते