लवासासारख्या प्रकल्पांमुळे निसर्गाचा मुडदा पडला अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. भिडे गुरुजींनी सांगली, कोल्हापुरातल्या पूर स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. निसर्गाचा माणसानेच मुडदा पाडला आहे त्यामुळे त्याचं रौद्ररुप पाहण्यास मिळतं. २००५ पेक्षा शंभरपटीने भीषण स्थिती सांगली कोल्हापुरात अनुभवयाला मिळाली. फक्त लवासाच नाही गावोगावी असाच निसर्गाचा मुडदा पडतो आहे असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. आता आईच्या मायेनं सगळं सावरायला हवं आहे हे बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.

सांगलीमध्ये महापुराने थैमान घातले आहे. अनेक घरं पाण्याखाली गेली. गावं बुडाली, लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. अनेक जनावरं वाहून गेली. आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत होते आहे. पाणी ओसरु लागलं आहे. मात्र आठवडाभर सांगली आणि कोल्हापूरकरांनी निसर्गाचं रौद्ररुप काय असतं ते अनुभवलं. पाणी ओसरु लागल्यानंतर ज्या पुढे वाढून ठेवलेल्या समस्या आहेत त्या काय काय आहेत हे जाणून घेण्यासाठी संभाजी भिडे यांनी दौरा केला. याच दौऱ्या दरम्यान एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना लवासासारख्या प्रकल्पांमुळे निसर्गाचा मुडदा पडला अशी टीका त्यांनी केली. फक्त लवासाच नाही तर गावोगावी अशाप्रकरे निसर्गाचा मुडदा पडतो आहे असाही आरोप त्यांनी केला.

निसर्गाच्या या आपत्तीला आधुनिकीकरण जबाबदार आहे. २००५ ला म्हणत होते की साठ वर्षांनी असा पूर आला. मात्र आत्ता आलेलं संकट हे २००५ च्या पुराच्या तुलनेत शंभरपटीने जास्त आहे. अनेकजण ताठपणे याही परिस्थितीला तोंड देत आहेत. ही बाब खरंच कौतुकाची आहे असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्तेही पूरग्रस्तांना मदत करत आहेत. प्रशासन पूर परिस्थिती सावरण्यासाठी योग्य दिशेने पावलं टाकतं आहे असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. तसंच पूरस्थितीत जसे सगळेजण एकजूट करुन राहिले तसंच आता पुढच्या संकटांचा सामना करण्यासाठीही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे असंही आवाहन संभाजी भिडे यांनी केलं आहे.

काही गोष्टी अशा असतात की ज्या कोणाच्याही हाती नसतात. निसर्ग हा तसाच आहे, पंचमहाभुतांपैकीच पाणी हे एक आहे. आपण जर निसर्गाशी खेळ करु लागलो तर तो त्याचं रुप कसं दाखवेल याचा थांग लागत नाही असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. तसंच आता आईच्या मायेने आपण सगळे पूरग्रस्तांना सावरण्यासाठी मदत करु असंही त्यांनी म्हटलं आहे.