गोंदिया : दिल्लीत निवडणूक तोंडावर आली असताना आपल्याला देशातील सर्व मोठय़ा पक्षांनी विविध प्रलोभनासह प्रवेशाचा प्रस्ताव दिला असून निर्णयाचा चेंडू मी माझ्या कोर्टातच ठेवलेला आहे. याबाबत कोणताही विचार केला नाही. योग्य वेळ आल्यास तो चेंडू टोलवू, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी दिली. रविवारी सायंकाळी गोंदिया येथील कविसंमेलन काव्यांजली कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यासंदर्भात दिल्लीतील भाजपचे मनोज तिवारी, विजय गोयल  काँग्रेसतर्फे अजय माकन, संदीप दीक्षित आदी नेत्यांनी आपल्या निवासस्थानी येऊन माझ्याशी चर्चा केलेली आहे. आपण कुणालाही कोणतेही आश्वासन दिलेले नसून प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले आहे. योग्य वेळ आल्यास आपण ठरवू मात्र दिल्लीतील प्रत्येक वाहिन्यांनी कुमार विश्वास कोणत्या पक्षात जाणार, असे मथळे तयार करून दररोज एक कार्यक्रम दाखवण्याचा सपाटा दिल्लीतील निवडणुकीदरम्यान लावला असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली विधानसभेच्या २०१५ च्या  निवडणुकीनंतर राज्यसभेच्या निवडणुकीवेळी षडयंत्र करून आपल्याला जाणून बाहेर करण्यात आले असून त्यावेळी तापलेल्या दुधाने आपले तोंड भाजले असल्यामुळे आपण आता ताकही फुंकून पीत असल्याचे कुमार विश्वास यांनी सांगितले.