राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) विधेयकाविरोधात आणि अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नेतृत्वात उद्या(दि.8) देशभरात संपाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, आयएमएशी संलग्न पुण्यातील डॉक्टरांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतलाय. आमचा संपाला पाठिंबा आहे पण राज्यातील बहुतांश भागात असलेल्या पूरपरिस्थितीमुळे संपात सहभागी होणार नाही, अशी भूमिका पुण्यातील डॉक्टरांनी घेतली आहे.

“आमचा संपाला नक्कीच पाठिंबा आहे, पण राज्यातील पूरपरिस्थिती विशेषतः कोल्हापूर आणि सांगलीमधील परिस्थिती पाहता संपात सहभागी होऊ नये असा निर्णय आम्ही घेतलाय. रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही डॉक्टरांची 10 ते 12 पथकं स्थापन केली असून विविध ठिकाणी ते रुग्णांवर उपचार करतील. राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आम्ही संपात सहभागी होणार नाही”, असं आयएमएच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. संजय पाटील म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त दिलंय.

आयएमएने 8 ऑगस्ट रोजी देशभरात 24 तासांचा संप पुकारला आहे. या संपादरम्यान खासगी हॉस्पिटलमधील बाह्यरुग्णसेवा, रक्त, मल, मूत्रा तपासणी तसेच एमआरआय व सिटी स्कॅनही बंद राहील. परिणामी देशभरात रुग्णांची गैरसोय होणार आहे, पण पुण्यातील डॉक्टरांनी संवेदनशीलता दाखवत संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.