दीडशे वर्षांपूर्वी शेकडो गावांची तहान भागवणारी सांगली जिल्ह्य़ातील अग्रणी नदी गेली कित्येक दशके निसर्ग आणि मानवी उपद्रवांमुळे हरवून गेली होती. गाळ, माती, झाडाझुडपांनी तिचे अस्तित्वच संपवून टाकले. प्रशासन आणि लोकसहभागातून लुप्त झालेल्या या नदीचे पात्र प्रवाहित करण्याच्या कार्यामुळे आता १०५ गावांना पाण्याचा लाभ झाला असून या कार्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली जिल्ह्य़ाच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम पावणारी अग्रणी नदी खानापूरसह तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातून ५५ किलोमीटर वाहून कर्नाटकात जाते. या नदीचे २२ किलोमीटरचे पात्र लुप्त झाले होते. सात वर्षांपूर्वी नदीच्या पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेण्यात आले. राज्य शासनाची योजना, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागाने वर्षांनुवर्षे कोरडय़ा पडलेल्या नदीला पुनरुज्जीवन मिळाले.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जल क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी वर्ष २०१९ चे ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ नुकतेच घोषित झाले. विविध १२ श्रेणींमध्ये एकूण ८८ पुरस्कार जाहीर झाले. नदी पुनरुज्जीवन श्रेणीमध्ये देशातील एकूण ६ विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्ह्य़ांना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्य़ातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. पुढील आठवडय़ामध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. भाई संपतराव पवार यांनी नदीचे पुनरुज्जीवन करण्याची कल्पना मांडली होती. जलबिरादरीचे सुनील जोशी, विलास चौथाई यांच्या प्रयत्नातून ही संकल्पना पुढे आली.  तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी टंचाईस्थितीमध्ये नदी पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले.

अग्रणीचे पुनरुज्जीवन कामाची राष्ट्रीय पातळीवर पुरस्कारासाठी घेतलेली दखल म्हणजे या कामात सहभागी लोकांचाच सन्मान आहे. अग्रणी प्रवाहित झाल्याने या काठावरील २८ हजार लोकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला असून याचाच आदर्श घेऊन कर्नाटकातील तीन गावांनीही हे काम पुढे सुरू केले आहे.

– शेखर गायकवाड, तत्कालीन सांगलीचे जिल्हाधिकारी, विद्यमान साखर आयुक्त

हे सारे कसे झाले? लोकसहभागाने नदी पुनरुज्जीवनाचे २ कोटींचे काम ६५ लाख रुपयांत करण्यात आले. नदीचे पात्र ५० फूट रुंद, ६ फूट खोल करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी ५० ते ६० नालाबांध घालण्यात आले. यामुळे पात्रात पाणीसाठा होऊन २१ गावांना पाण्याचा प्रत्यक्ष लाभ होत असून अग्रणी खोरे बारमाही होऊन १०५ गावांतील जलस्तर उंचावण्यास मदत झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revival of agrani river in sangli district abn
First published on: 06-11-2020 at 00:09 IST