लातूर-नांदेड राज्य महामार्गावर दोन क्रुझर व टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातामुळे सात जण जागीच ठार तर १३ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार) पहाटे चारच्या सुमारास कोळपापाटीजवळ घडली. अपघात इतका भीषण होता की, एका क्रुझरचा अक्षरश: चक्काचूर झाला.  टेम्पोला ओव्हरटेक करताना दोन क्रुझरची समोरासमोर टक्कर झाली.  या मार्गावरील मागील १५ दिवसातील हा दुसरा भीषण अपघात आहे. मृत तसेच जखमींमध्ये लातूर, नांदेड, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांचा समावेश असल्याचे समजते.

कोळपापाटीजवळ टायर खराब झाल्याने एक टेम्पो बंद अवस्थेत उभा होता. पहाटे चारच्या सुमारास एक भरधाव क्रुझर या टेम्पोला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या क्रुझरशी समोरासमोर धडक बसली. यात सात जण जागीच ठार झाले तर १३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी लातूर पोलिसांनी त्वरीत धाव घेतली.

मृत व्यक्तींची नावे अशी, विजय तुकाराम पांडे (वय ३०, रा. नाशिक), तुकाराम ज्ञानोबा दळवे (वय ३५, लातूर), मनोज चंद्रकांत शिंदे (वय २५, लातूर), दत्तू बळीराम शिंदे (वय ३५, नांदेड), शुभम शरद शिंदे (वय २५, अहमदनगर), उमाकांत सोपान कारुले (वय ४५), मीना उमाकांत कारुले (वय ४०, लातूर).