News Flash

संजय खोडकेंचा बसपच्या देवपारेंना पाठिंबा, वऱ्हाड विकास मंच स्थापन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर खोडके यांनी कार्यकर्त्यांचा कौल घेत अमरावती मतदार संघातील बसपचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना आपला

| April 2, 2014 10:13 am

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर खोडके यांनी कार्यकर्त्यांचा कौल घेत अमरावती मतदार संघातील बसपचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. संजय खोडके यांनी वऱ्हाड विकास मंच या संघटनेची स्थापना केली असून सामाजिक आणि राजकीय कार्य या संघटनेच्या माध्यमातून पुढे नेण्याचे सुचित केले आहे. दुसरीकडे, खोडके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरील निष्ठा कायम असल्याचेही स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असलेले संजय खोडके यांची २९ मार्चला पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. अभिनेत्री नवनीत कौर-राणा यांना राष्ट्रवादीने अमरावतीतून उमेदवारी जाहीर केल्यानंतर खोडके यांनी उघड विरोध जाहीर होता. शरद पवार यांच्या परतवाडा येथील प्रचार सभेवरही खोडके गटाने बहिष्कार टाकला. शिवाय, अजित पवार यांच्या सभेतही खोडके गटाचा एकही कार्यकर्ता फिरकलेला नव्हता. संजय खोडके यांनी सोमवारी सायंकाळी येथील छत्री तलाव परिसरात कार्यकर्त्यांच्या बैठक घेतली. यात त्यांनी समर्थकांशी चर्चा केली आणि बसपचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना पाठिंबा जाहीर केला. खोडके यांच्या नेतृत्वाखालील वऱ्हाड विकास मंचच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात सहभाग घेण्याचा मनोदय त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. खोडके यांनी स्वतंत्र चूल मांडली असली, तरी शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या कामाचा आदर्श आपल्यासमोर आहे, त्यांचे कार्य आपल्याला सातत्याने प्रेरणादायी ठरणार असल्याचे खोडके यांनी म्हटले आहे.
गुणवंत देवपारे यांना बसपची उमेदवारी मिळण्याआधी त्यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली होती. संजय खोडके यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. शरद पवार यांच्यासोबत देवपारे यांची दोनदा चर्चाही झाली होती, असे समजते, पण नंतरच्या घडामोडींमध्ये बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना राष्ट्रवादीने उमेदवारी बहाल केली. राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणाऱ्या रवी राणा यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची काही नेत्यांची खेळी ही खोडके यांच्या राजकीय भवितव्यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे सांगून खोडके यांच्या समर्थकांनी नवनीत राणा यांना विरोध केला होता. खोडके यांनीही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात आपण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही, असे स्पष्टपणे सांगून टाकले होते. मध्यंतरीच्या काळात खोडके यांचे मन वळवण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आला, पण खोडके आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे पक्षाच्या कारवाईला त्यांना सामोरे जावे लागले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2014 10:13 am

Web Title: sanjay khodke supports bsp
Next Stories
1 अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कॉग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला प्रश्न
2 कोपरगाव येथे भीषण अपघातात ४ ठार
3 वाकचौरेंकडून निवडणूक आयोगालाच साकडे
Just Now!
X