एकीकडे विरोधकांकडून झालेल्या आरोपांमुळे राजकारण तापलेलं असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचं रोखठोक सदर चर्चेचा विषय ठरलं आहे. संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह ठाकरे सरकारवरही राऊत यांनी निशाणा साधला होता. राऊत यांच्या लेखाचा हवाला देत भाजपाने शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पलटवार केला आहे.

संजय राऊत यांनी लिहिलेल्या रोखठोक सदरातील लिखाणाचा संदर्भ देत भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “सचिन वाझे हा शिवसेनेचा, गृहमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळातील इतर लोकांचा लाडका आणि भरवशाचा माणूस होता, हे स्वतः संजय राऊत यांनीच कबूल केलं आहे. वाझे वसूली करत होता, हे सगळ्यांना माहीत होतं. कृत्य बाहेर आलं म्हणून सारवासारव करण्याचा तुमचा कारभार जनतेला माहीत आहे,” अशी टीका भाजपाने केली आहे.

“एक मोठ्या हुद्द्यावरचा अधिकारी थेट गृहमंत्र्यांवर आरोप करतो. त्याबद्दल आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक शब्दसुद्धा काढत नाहीत. स्वतःच्या गृहमंत्र्यांवर विश्वास नाही की, त्या अधिकाऱ्यांवर? तुमचं ‘डॅमेज’ झालेल्या सरकारची झळ महाराष्ट्राच्या जनतेला सोसावी लागत आहे”, असंही भाजपाने म्हटलं आहे.

राऊत नेमकं काय म्हणाले होते?

“परमबीस सिंह हे महत्त्वाकांक्षी अधिकारी आहेत. होमगार्ड महासंचालक पदावरील बदली ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या अस्वस्थतेत तेल ओतले ते गृहमंत्री देशमुखांनी. पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले असे एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी कसं दिलं होतं, अशा पत्राचा स्फोट केला. पुन्हा हे टार्गेट कुणाला दिले, तर मनसुख हिरेन या तरुणाच्या हत्येचा आरोप ज्यांच्यावर आहे त्या सचिन वाझेंना. सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता, तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?,” असं राऊत यांनी म्हटलं होतं.