लोकसत्ता प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यात आणखी सात करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एका महिला रुग्णाने करोनावर मात केल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यात नियंत्रणात असलेला करोना ग्रामीण भागात वेगाने हातपाय पसरतो आहे. विशेषत: मुंबई किंवा इतर ठिकाणावरून जिल्ह्यात दाखल झालेल्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या वाढली. जिल्ह्यात शनिवारी आणखी सात रुग्ण आढळून आले.

वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से येथील ३२ वर्षीय महिलेचा अहवाल सकारात्मक आला आहे. ही महिला बोराळा हिस्से येथील १० जून रोजी आढळून आलेल्या करोनाबाधिताच्या संपर्कातील आहे. कारंजा लाड विश्रामगृह परिसरातील करोनाबाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातील ४५ वर्षीय महिला व १५ वर्षीय युवतीला संसर्ग झाल्याचे निदान झाले.

औरंगाबाद येथून रिसोड येथे आलेल्या २०, २४ व २७ वर्षीय युवकांचे करोना चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील ६५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या रुग्णाला करोनाची लक्षणे असल्याने खासगी रुग्णालयातून पाठविण्यात आले होते. दरम्यान, मानोरा तालुक्यातील ६० वर्षीय महिला करोनातून बरी झाल्याने आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.