परभणी : केंद्र सरकारने पाकिस्तानातून कांदा आयात केला. परिणामी इथल्या किमती पडल्याने शेतकरी गाडीवर कांदे फेकतील, अशी भीती सरकारला होती. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर बाजारात कोणी कांदा आणायचा नाही, असे बजावण्यात आले. काही कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या, काहींना अटकही केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला.

आपल्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यास हे सरकार तुरुंगात डांबते. ज्याच्या मनगटात धमक आहे आणि स्वाभिमान शिल्लक आहे, असा कोणताही माणूस हे सहन करणार नाही, असेही पवार या वेळी म्हणाले.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी पवार यांनी संवाद साधला. यावेशी त्यांनी केंद्र सरकावर सडकून टीका केली. सबंध देशात मंदीची लाट असून शेतमालाच्या किमती कोसळल्या आहेत. शेतमजुरांच्या हाताला काम नाही. बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत आणि नोकरभरतीची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी वेगळीच भरती सुरू केली, पण काही माणसे गेली तरी त्याची मला चिंता नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही राज्य करतो, असे म्हणणारी माणसे फसवी आहेत. नाव शिवाजी महाराजांचे घ्यायचे आणि आपला धंदा सुरू करायचा, ही यांची नीती आहे, अशा शब्दांत त्यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर नामोल्लेख टाळून टी्रका केली.

नव्या पिढीचे नेतृत्व उभे करणार 

नांदेड : विकासाचा रथ जोमाने पुढे नेत महाराष्ट्राच्या उभारणीसाठी नव्या पिढीचे नेतृत्व उभे करणार असून ज्येष्ठांची सगळी ताकद या नव्या पिढीच्या पाठीशी राहील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. देशात सगळीकडे मंदीची लाट पसरली असून दोन वेळेच्या अन्नाचा प्रश्न मिटविणारा लाखोंचा पोशिंदा असणारा माझा शेतकरी संकटात सापडला आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी सरकारने ७२ हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिली होती. अन्न-धान्याची निर्यात करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश अशी भारताची ओळख निर्माण करण्याचे काम काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात झाले असून याचे सर्व श्रेय आपल्या शेतकऱ्यांना आहे, असे पवार म्हणाले.

शेतकऱ्यांचे नव्हे तर कारखानदारांचे कर्ज माफ करणार असल्याचे अमित शहा सांगत आहेत, अशी टीका पवार यांनी भाजप सरकारवर केली. पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रखडलेल्या स्मारकाच्या कामावरूनही सरकारला लक्ष्य केले. नांदेडचा चेहरा-मोहरा स्व. शंकरराव चव्हाण व अशोकराव चव्हाण यांच्यामुळे बदलला आहे, असे सांगत खासदार शरद पवार यांनी चव्हाण पिता-पुत्राच्या विकास कार्याचाही गौरव केला.

भाजपला कांद्याची भीती!

नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेसाठी पंतप्रधान येणार म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटिसा बजावल्या असून कुठेही कांदा दिसणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. इतके भाजपवाले कांद्याला भीत आहेत, असा टोला पवार यांनी लगावला. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणाऱ्यांना सत्तेच्या खुर्चीत बसू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप एकत्रित निवडणूक लढवणार असून नांदेडमध्ये राष्ट्रवादी दोन जागा लढविणार आहे.

साथ सोडणाऱ्यांची वाट लावणार!

लातूर : सत्तेत ज्यांना मंत्रिपदे दिली, मानाचे स्थान दिले, त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. असे असताना ज्यांनी आपली साथ सोडली, त्या सर्वाची वाट लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लातूरच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिला. मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर धनंजय मुंडे, बसवरावज पाटील नागराळकर, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, अफसर शेख, डी. एन. शेळके, मकरंद सावे आदी उपस्थित होते. या निवडणुकीत ऐन वेळी ज्यांनी आपली साथ सोडली अशांची वाट लावणार व संकटकाळात सामान्यांच्या मदतीसाठी जे धावून येणार नाहीत, अशांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार पवार यांनी व्यक्त केला. कोल्हापूर, सांगली परिसरात अतिवृष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगलीला अर्धा तास धावती भेट दिली आणि त्यानंतर हवाई पाहणी केली. सत्ताधाऱ्यांच्या मनात संकटग्रस्तांबद्दल ओलावाच नाही. राज्याचे मुख्यमंत्री प्रतिनिधित्व करत असलेल्या नागपूर शहराचा गुन्हेगारीत देशात पहिला क्रमांक आहे. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. गडकिल्ल्यांचा शौर्याचा इतिहास नव्या पिढीला शिकविण्याऐवजी तेथे दारूची दुकाने चालवली जाणार आहेत. नव्या पिढीला छमछमचा इतिहास सांगणार का, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

‘ईडी’ची भीती दाखवू  नका – धनंजय मुंडे

नागव्याचे नवग्रह बलवान असतात, त्यामुळे ईडीची भीती आम्हाला दाखवू नका, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या मंडळींवर टीका करत हा पक्ष मातीत गाडल्याशिवाय आपण गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला.