महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शीतल आमटे करजगी यांचा मृत्यू श्वास नलिकेत अन्न अडकल्यामुळे गुदमरुन (चोकींग) झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार म्हणता येईल. मात्र प्राणघातक इंजेक्शन, व्हिसेरा, मोबाईल, लॅपटॉप, टॅब याचा चंद्रपूर व नागपूरातील रासानयिक परिक्षणाचा अहवाल तथा मुंबईच्या न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल येणे बाकी आहे. या दोन्ही प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक अरविंद साळवे यांनी दिली.

शीतल आमटे करजगी मृत्यू प्रकरणाला आज बुधवार ३० डिसेंबर रोजी एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. ३० दिवसानंतरही या मृत्यू प्रकरणाचा शोध सुरूच असल्याची माहिती पोलीस अधीक्षक साळवे यांनी दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, तपास अधिकारी डॉ.निलेश पांडे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत साळवे यांनी शीतल आमटे करजगी या एक ते दीड वर्षापासून मानसिक तणावात होत्या, त्यांच्यावर नागपुरातील एका मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू होते असे सांगितले. याच कालावधीत जून महिन्यात झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांना नागपूरच्या व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. त्यानंतर ३० नोव्हेंबरला त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी त्यांनी नागपुरातील नेहमीच्या औषधविक्रेत्याकडून कुत्रे अल्सरच्या त्रासाने पीडित असल्याचे कारण सांगून नेक्युरोन, केसोल व मेडझोल असे तीन प्रकारचे प्राणघातक इंजेक्शन (लेथल) प्रत्येकी पाच नग मागविले. विशेष म्हणजे यापूर्वी हे इंजेक्शन आनंदवनातील रूग्णालयात वापरले गेलेले नाही.

शीतल यांचा मृत्यू झाला त्या खोलीतून नेक्युरोन इंजेक्शनचे अ‍ॅम्पुल व सिरिंज मिळाले आहे. शीतल यांच्या उजव्या हातावर इंजेक्शनचे मार्क दिसून आले आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोबाइल, एक लॅपटॉप, एक टॅबलेट, मुद्देमाल, व्हिसेरा ताब्यात घेतला आहे. या सर्व वस्तू रासायनिक परिक्षणकामी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, चंद्रपूर नागपूर या ठिकाणी पाठविल्या आहे. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई या ठिकाणी पाठविल्या आहेत. या दोन्ही प्रयोगशाळेचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार श्वास रोखल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद आहे. या मृत्यू प्रकरणात प्रथम दर्शनी पुराव्यावरून घातपात दिसून आलेला नाही असेही साळवे यांनी सांगितले. या मृत्यू चौकशी प्रकरणात २६ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. शीतल यांनी  मृत्यूपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नाही. तशी चिठ्ठीही मिळाली नाही असेही साळवे यांनी सांगितले.