जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षेनुसार शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यत भाजपाने लक्षवेधी शिरकाव केला आहे. तसेच जिल्हाध्यक्ष आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण-संगमेश्वर पट्टय़ात राष्ट्रवादी काँग्रेसने अस्तित्व राखले आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार राजन साळवी आणि योगेश कदम या सेना नेत्यांनी अपेक्षेनुसार जिल्ह्यतील ९ तालुक्यांपैकी राजापूर, लांजा, रत्नागिरी, खेड, दापोली आणि मंडणगड या ६ तालुक्यांमध्येआपली पकड बऱ्याच प्रमाणात कायम राखली आहे. मात्र दीर्घ काळानंतर प्रथमच स्वतंत्रपणे निवडणुका लढवत असलेल्या भाजपाने जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट दीपक पटवर्धन आणि माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी खासदार नीलेश राणे इत्यादींच्या नेतृत्वाखाली राजापूर, लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्वर या चार तालुक्यांमध्ये लक्षवेधी शिरकाव केला आहे. त्याचबरोबर, संगमेश्वर, चिपळूण आणि गुहागर या तीन तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व कायम राखण्यात यश मिळवले, पण या पक्षाचे माजी आमदार संजय कदम खेड—दापोलीमध्ये निष्प्रभ ठरल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली आहे.
शिवसेनेने रत्नागिरी तालुक्यात ५३ ग्रामपंचायतींपैकी ४६, खेड तालुक्यात ८७ पैकी ६७, तर मंडणगड—दापोली तालुक्यातील ७२ पैकी ५१ ग्रामपंचायतींवर भगवा फडकला असल्याचा दावा केला आहे. संगमेश्वर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींपैकी २७ सेनेकडे आल्या आहेत, तर उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने जवळपास समान प्रमाणात जिंकल्याचा दावा केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस केवळ अस्तित्व टिकवून ठेवू शकली आहे, तर भाजपाने काही ठिकाणी नव्याने खाते खोलले आहे.
राजापूर तालुक्यातील ५१ पैकी शिवसेनापुरस्कृत गाव पॅनेलसह तब्बल ४० ग्रामपंचायतीवर शिवसेनेने वर्चस्व राखल्याचा दावा आमदार राजन साळवी यांनी केला आहे. मात्र शिवसेनेच्या अनेक वर्षांपासून असलेल्या वर्चस्वाला धक्का देताना पाच ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व राखल्याचा दावा केला आहे.
लांजा तालुक्यात एकहाती सत्ता असलेल्या शिवसेनेने २३ ग्रामपंचायतीपैकी सुमारे निम्म्या ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसने दोन ग्रामपंचायतीत खाते खोलले. १० ग्रामपंचायतींमध्ये गाव पॅनेलची सरशी झाली आहे. भाजपने १९ ग्रामपंचायतींमध्ये उमेदवार निवडून आणत स्वतंत्र अस्तित्वाची चुणूक दाखवली आहे. तसेच आधी खाते खोलता न आलेल्या मनसेने विजयाची नांदी केली.
संगमेश्वर तालुक्यात ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये ५ ते ६ ग्रामपंचायतींकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये अत्यंत अटीतटीच्या लढती झाल्या. यात तीन ठिकाणी सेनेला फटका बसला, तर उर्वरित ठिकाणी सेनेला यश आले. मात्र यातून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा जंगी सामना पाहायला मिळाला. नावडीमध्ये सेना, भाजपच्या लढाईत राष्ट्रवादीने बाजी मारली, तर निवडणुकीत बंडखोरी केल्याबद्दल सेनेतून हकालपट्टी झालेले माजी सरपंच वसंत उजगावकर आणि कल्पेश ओकटे यांनी बाजी मारली.
बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये सेनेचेच सरपंच – उदय सामंत
निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यत ४७९ ग्रामपंचायतींपैकी ३२४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच विराजमान होतील. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील ६३ ग्रामपंचायतींपैकी ५२ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर ६३ पैकी ६० ग्रामपंचायतींवर सेनेचे सरपंच विराजमान होतील, असा विश्वास आहे.
भाजपाचे विक्रमी यश – अॅडव्होकेट पटवर्धन
दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यतील राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने ६७ जागांवरून २९६ अशा विक्रमी संख्येपर्यंत मजल मारली आहे. गेल्या २० वर्षांत एवढय़ा विक्रमी संख्येने उमेदवार विजयी होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
पक्षीय बलाबल (अंदाजे)
एकूण ग्रामपंचायती- ४७९
शिवसेना – ३००
राष्ट्रवादी काँग्रेस – ६०
भाजपा – २०
गाव पॅनेल – ६५
इतर – ३४