राज्यात करोनानं थैमान घातलं आहे. अगदी तुरूंगापर्यंत करोनाचे विषाणू पोहोचले असून, करोनाविरुद्ध पहिल्या फळीत लढणाऱ्या पोलिसांना करोनाची मोठ्या संख्येनं लागण झाली आहे. राज्यात एक हजाराहून अधिक पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर काहीजणांना जीवही गमवावा लागला आहे. पोलिसांवर ओढवू पाहत असलेल्या संकटावर शिवसेनेनं चिंता व्यक्त केली आहे.

राज्यातील पोलीस करोनाविरुद्धच्या लढ्यात लढत आहेत. अशात स्थितीत पोलीस नागरिकांच्या जिवासाठी सेवा बजावत असून, अनेकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यात काही पोलिसांचा मृत्यू झाल्यानं शिवसेनेनं चिंता व्यक्त केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून याविषयी भाष्य करणयात आलं आहे.

“कोणी काही म्हणोत, पण निदान महाराष्ट्रात तरी खरे करोना योद्धे हे पोलीस, डॉक्टर्स व परिचारिका आहेत. करोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे व योद्ध्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. राज्यभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा पंचवीस हजारांवर पोहोचला आहे व त्यात पोलिसांची संख्या १ हजार २५ वर जाऊन पोहोचली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गेल्या चोवीस तासांतच २२५ पोलिसांना करोनाची लागण झाली. त्यात १०६ अधिकारी आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापुरात कोरोनाग्रस्त पोलिसांचे मृत्यू झाले आहेत. पोलिसांना उसंत नाही, विश्रांती नाही, ते अहोरात्र झुंज देत आहेत. पोलीस खाते हे राजकारण्यांसाठी दरारा निर्माण करणारे आहे, पोलिसांना चिरीमिरी लागते आदी आरोप करणे सोपे आहे. डहाणूच्या साधू हत्याकांडात सगळ्यात जास्त सोसावे लागले ते पोलिसांनाच. कुठे काही खट्ट वाजले तरी पोलिसांना सरळ धोपटले जाते, पण आज तोच पोलीस जिवावर उदार होऊन करोनाशी लढतो आहे. अनेक ठिकाणी करोनानं मरण पावलेल्यांना खांदा द्यायला त्यांच्याच आप्त, मित्र परिवाराने नकार दिला, तेव्हा पोलिसांनी त्या करोना मृतांचे अंत्यसंस्कार केले. अशा पोलिसांचे मनोबल वाढवायला हवे. पोलिसांना वाली कोण, असा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अभिनेता जितेंद्र जोशी याने करोना रणातील झुंजार पोलिसांना मानवंदना देणारे एक गाणे रचले व लोकांसमोर आणले ते उत्तमच आहे. करोनाशी लढताना महाराष्ट्रात एक हजारावर पोलिसांना करोना विषाणूने घायाळ केले. त्यातले काही हे जग सोडून गेले आहेत, त्या वीरांना प्रणाम! करोनाच्या लढाईत जनतेला वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्य़ा पोलिसांना वाचवायला हवे!,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.