राज्यात मागील चार वर्षाच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उध्द्वव ठाकरे वारंवार सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा आहे. आजही पालघर पोटनिवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने शिवसेना सराकारमधून बाहेर पडेल असं बोललं जात होतं, मात्र ते काही बाहेर पडले नाहीत. यापूर्वी जेव्हा केव्हा शिवसेना बाहेर पडण्याची चर्चा रंगली त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांमध्ये फूट पडल्याचं वृत्त होतं. त्यामुळे आता जर ते सरकारमधून बाहेर पडले तर आगीमधून फुफाट्यात पडल्यासारखी त्यांची अवस्था होईल, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उध्द्वव ठाकरे यांना टोला लगावला. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहापासून नितीन गडकरी शिवसेनेसोबत जाण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत, आणि भाजपाला आगामी निवडणुकीत शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अजित पवार म्हणाले की,पोटनिवडणुकीतील निकालातून भाजपाला आता वस्तूस्थिती लक्षात आली असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाचे नेते शिवसेनेला सोबत घेतील. निवडणुकीपूर्वी शिवसेनेला मंत्रपद देण्याबाबत चर्चा देखील होईल. किमान शेवटच्या वर्षासाठी उपमुख्यमंत्रीपद देतील. यामुळे शिवसेना बाहेर पडण्याची शक्यता फार कमी आहे, असं ते म्हणाले. तसंच, आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी प्रयत्न करु असंही अजित पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, राज्यात आज झालेल्या पोटनिवडणुकीत पालघर निवडणुकीमध्ये समविचारी पक्ष एकत्र आले असते तर आज चित्र वेगळे दिसले असते .पण तसे झाले नसल्याची खंत व्यक्त करीत भंडारा गोंदियाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्याचा आंनद आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी योग्य भूमिका घेतल्याने हे सर्व शक्य झाले. गोंदियामधील भाजपाचा पराभव हा सरकार विरोधात नागरिकांमध्ये चीड असल्याने झाला आहे. त्याचबरोबर पालघरमधील भाजपाचे राजेंद्र गावित कमी मताधिकायाने निवडून आले आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा आता राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.

आघाडी सरकावर पावती फाडू नका : अजित पवार
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अनेक समस्यांवर आघाडी सरकावर पावती फाडण्याचे काम केले जात आहे. या भाजपाला सत्तेमध्ये येऊन आता चार वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे त्यांनी आता याचे भान ठेवावे आणि मागील सरकारवर पावती न फाडता स्वतः चे कर्तृत्व दाखवावे, अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.