कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारांची शक्यता

राज्याच्या बहुतांश भागामध्ये मागील दोन आठवडय़ांपासून विश्रांती घेतलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस रविवारपासून सक्रिय झाल्यानंतर सध्या राज्यात सर्वदूर श्रावणधारा बरसत आहेत. मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, कोकणासह विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या बहुतांश भागात सोमवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. पुढील तीन ते चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पंजाबच्या अमृतसरपासून पूर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सध्या कार्यरत आहे. उत्तर ओडिशा आणि परिसराच्या समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहात आहेत. त्यामुळे उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे मोसमी पाऊस सक्रिय होऊन सह्यद्रीच्या घाटमाथ्यासह महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये त्याचा जोर वाढणार आहे. उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेशात मुसळधार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती. ऑगस्टच्या सुरुवातीच्या आठवडय़ातही हलक्या सरीच बरसल्या. मात्र, रविवारपासून गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यंतील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. कोकणात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यंत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि मराठवाडय़ातील नांदेड जिल्ह्यत सर्वदूर जोरदार, तर लातूरसह जिल्ह्यलगत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

पाऊसमान : मागील चोवीस तासांत प्रमुख ठिकाणी नोंदविलेला पाऊस (मि. मी.) पुढीलप्रमाणे-  कोकणातील राजापूर १३०, सांगे ११०. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर ८०, चंदगड, लोणावळा (कृषी), राधानगरी ६०, गगनबावडा ५०, वेल्हे ४०, इगतपुरी, कागल, पौड , मुळशी, शाहुवाडी ३०. विदर्भातील गोंदिया ६०, आमगाव, चामोशी, सालेकसा, यवतमाळ ३०. घाटमाथा परिसरातील शिरगाव ११०, दावडी, ताम्हिणी ९०, कोयना (नवजा) ८०, लोणावळा (टाटा) ७०, शिरोटा, अम्बोणे, डुंगरवाडी ६०, वळवण, भिवपुरी, खोपोली ५०, ठाकूरवाडी, वाणगाव, कोयना (पोफळी), खांद ४०.