पाशा पटेल यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांची अडचण

प्रदीप नणंदकर, लातूर</strong>

देशांतर्गत उत्पादनात घट, विदेशातील मर्यादित उत्पादन व चीनची मोठी गरज यामुळे सोयाबीनचा भाव चार हजारांच्या वर जाईल अशी चर्चा गेल्या तीन महिन्यांपासून होत असली तरी सोयाबीनचा भाव काही ३ हजार ९०० रुपयांवर जायला तयार नाही. कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीनची विक्री करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये, या वर्षी चार हजारांपेक्षा अधिकचा भाव नक्की मिळेल, असे सांगितले होते. मात्र सध्या तरी शेतकऱ्याला हा भाव मिळत नाही.

जून ते सप्टेंबर २०१८ दरम्यान चार महिन्यांच्या पावसात सरासरी ९ टक्के घट झाली. पावसात घट झालेली असली तरी केंद्रीय कृषी मंत्रालयाने २८ फेब्रुवारी २०१९ रोजी देशातील प्रमुख शेतमालाच्या अंदाजित उत्पादनाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात सोयाबीनचे उत्पादन १३६ लाख ९० हजार टन इतके होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. २०१७-१८ च्या हंगामात हे उत्पादन ८४ लाख टनांच्या आसपास होते.

अमेरिकास्थित कृषी विभागाने भारतातील सोयाबीनच्या उत्पादनाचा अंदाज १०३ लाख टन इतका सांगितला आहे तर देशातील सोयाबीन मिल असोसिएशनच्या ‘सोपा’ संघटनेने ११४ लाख टनांचा अंदाज व्यक्त केला आहे. देशात नेमके सोयाबीनचे उत्पादन किती झाले आहे याचा ताळमेळच अद्याप लागत नाही. त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. बाजारपेठेत होणाऱ्या सोयाबीनची आवक दरवर्षीच्या मानाने कमी आहे. असे असले तरी वेगवेगळे आकडे उत्पादन वाढलेले जाहीर होत असल्याने सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. देशात फक्त सोयाबीनलाच हमीभावापेक्षा (३३९९) अधिक भाव बाजारपेठेत मिळतो आहे. या वर्षी पाऊस कमी झाल्याने मराठवाडय़ातील शेतकऱ्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली. किमान अधिकचा भाव मिळाला तर तेवढाच लाभ होईल या हेतूने शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या भाववाढीवर नजरा आहेत. शासनाच्या वतीने निवडणुकीचे वर्ष डोळय़ांसमोर ठेवून शेतमालाच्या हमीभावात घसघशीत वाढ करण्यात आली. मात्र हमीभावाने सोयाबीन वगळता बाजारपेठेत एकाही मालाची विक्री होत नाही. त्यामुळे हमीभाव वाढवण्याची सरकारची घोषणा ही, ‘देणे ना घेणे, वाजवा रे वाजवा’ या पद्धतीची असल्याची प्रतिक्रिया लातूरच्या बाजारपेठेत शुक्रवारी ऐकायला मिळाली.

भावात नक्की वाढ होईल

आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे भावातील चढ-उतार होत असतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिकचा भाव मिळावा यासाठी आयात-निर्यातीच्या धोरणात मोठे बदल केले आहेत. वेळोवेळी आढावा घेऊन गरजेनुसार धोरण बदलले जाते. सोयाबीनच्या भावात वाढ नक्की होईल. चार हजार रुपयांचा टप्पा सोयाबीन लवकरच गाठेल, असा आशावाद राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केली.