सर्वाच्या सहमतीने विचारपूर्वक उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दिवसा घडय़ाळ व रात्री दुसरंच असे करू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वपक्षाच्या नेत्यांचे कान पिरगाळत तंबी दिली. आमदार विनायक मेटे यांना मंत्रिपद पाहिजे होते, त्यामुळे ते महायुतीबरोबर गेले, असा टोलाही पवार यांनी लगावला.
राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ सोमवारी केज येथे पवार यांची सभा झाली. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार पृथ्वीराज साठे, रमेश आडसकर आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, की बीडने महाराष्ट्रातील सर्वाधिक आमदार निवडून दिले, त्यामुळे दोन मंत्रिपदांबरोबरच सुचवलेल्या कामांना जास्तीचा निधी देण्याचे काम आपण अर्थमंत्री म्हणून केले. प्रलंबित कामे आता जूनमध्ये होणाऱ्या अधिवेशनात पूर्ण करू, असा शब्दही त्यांनी दिला.
भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांचा नामोल्लेख टाळून पवार म्हणाले, की या राष्ट्रीय नेत्याने स्वार्थासाठी दोन वेळा पक्षालाच वेठीस धरले. पवार कुटुंबीयांवर बेछूट आरोप करणे, हेच त्यांचे काम आहे. निवडणुकीत लोकांना आमिष दाखवून जवळ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा चिमटा काढून शिवसंग्रामचे आमदार मेटे यांना मराठा आरक्षणापेक्षा मंत्रिपद पाहिजे होते, मात्र आपण शरद पवार यांना विचारून याबाबत विचार करू, असे सांगितले होते. पण ते स्वत:ला राज्याचे नेते समजत असल्यामुळे महायुतीबरोबर गेले. सर्वाशी चर्चा करून विचारपूर्वक धस यांना उमेदवारी दिली. बीड जिल्हय़ात पक्षाची ताकद आहे. पण नेत्यांनी दिवसा घडय़ाळ व रात्री दुसरंच असे करू नये, अशा शब्दांत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना त्यांनी फटकारले. स्वत:चा पुतण्या जवळ ठेवता आला नाही, ते राजकारण काय करणार? असा हल्ला चढवत आईला भेटू दिले नाही, या खासदार मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, की मुलगा चांगला वागत असेल, तर आई त्याच्याकडे राहील. पण पंडितराव मुंडे चांगले वागतात, आई त्यांच्याकडे राहात असेल. पण निवडणुकीत डोळय़ांत पाणी आणून लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले. गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील उत्पादन अधिक आहे, असा दावा करून जातीय दंगली घडवणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहू नका, असे आवाहन पवार यांनी केले. पवार यांची माजलगाव येथेही प्रचारसभा झाली.