23 October 2019

News Flash

बेळगावमधील मराठी फलकावरील कारवाईने कोल्हापुरात तणाव

बेळगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या यळ्ळूर या गावातील यळ्ळूर, महाराष्ट्र राज्य असा मजकूर लिहिलेला फलक शुक्रवारी कर्नाटक शासनाने फाडला. प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई केली.

| July 26, 2014 04:30 am

बेळगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या यळ्ळूर या गावातील यळ्ळूर, महाराष्ट्र राज्य असा मजकूर लिहिलेला फलक शुक्रवारी कर्नाटक शासनाने फाडला. प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई केली. या घटनेच्या निषेधार्थ उद्या बेळगाव येथे मराठी भाषकांचा मेळावा होत आहे. शुक्रवार रात्रीपासून शनिवारी बेळगाव बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू होत्या. यळ्ळूर-बेळगावसह सीमा भागात मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला आहे. दरम्यान, मराठी भाषकांवर कर्नाटक शासनाने केलेल्या अन्यायाविरोधात कोल्हापुरात शिवसेनेने आंदोलन करताना कर्नाटक शासनाच्या सात एसटी बसची रात्री मोडतोड केली.
बेळगावपासून ५ किलोमीटर अंतरावर यळ्ळूर हे गाव आहे. या गावात यळ्ळूर, महाराष्ट्र राज्य असा फलक उभारण्यात आला आहे. हा फलक गतवर्षी कन्नड भाषकांनी पाडला होता. त्या वेळी मराठी भाषकांनी आपल्या एकजुटीचे दर्शन घडवत तेथे सिमेंट काँक्रीटचा चौथरा बांधून त्याच आशयाचा फलक उभा केला होता. तथापि काही महिन्यांपूर्वी गोकाक येथील कन्नड भाषक भीमाप्पा गडाद यांनी येळ्ळूर हे कर्नाटकात असताना तेथे महाराष्ट्र राज्य या नावाचा फलक कसा लावण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित करून तो काढून टाकण्याबाबत बेंगलोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना हा फलक हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी कर्नाटक प्रशासनाने हा फलक काढण्याच्या हालचाली गतिमान केल्या.
यळ्ळूर येथे शुक्रवारी हजारो पोलिसांच्या बंदोबस्तात हा फलक काढला. या वेळी यळ्ळूर ग्रामस्थांनी फलक हटविण्यास जोरदार विरोध दर्शविला. पण पोलिसांच्या आक्रमक शक्तीपुढे त्यांना नमते घ्यावे लागले. बेळगाव येथून मराठी भाषक यळ्ळूरला पोहोचू नयेत यासाठी वडगाव फाटा येथून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तरीही बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांच्यासह शेकडो सीमाभाषक घटनास्थळी पोहोचले. त्यांनाही पोलीस व प्रशासनाने विरोध केला. पोलिसांच्या व प्रशासनाच्या या कारवाईचा निषेध पाटील यांनी नोंदविला.
दरम्यान, या घटनेमुळे बेळगावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. शनिवारी मराठा मंदिर येथे मराठी भाषकांचा मेळावा होणार असून त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्या वेळी कोणती भूमिका घ्यायची याबाबत बठकीत चर्चा होणार आहे, असे एकीकरण समितीचे कार्यकारिणी सदस्य राजू मरवे यांनी सांगितले.
दरम्यान, यळ्ळूर येथे मराठी भाषकांना अवमानकारक वागणूक दिल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील शिवसनिकांनी येथील मध्यवर्ती बसस्थानकातील कर्नाटकाच्या सात ते आठ एसटी बसेसची मोडतोड केली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसनिकांनी बसस्थानकात येऊन दिसेल त्या कर्नाटक राज्याच्या गाडय़ांवर हल्ला चढवत त्यांची नासधूस केली. यामुळे बसस्थानकातील वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
 

First Published on July 26, 2014 4:30 am

Web Title: stress in kolhapur due to action on marathi flex in belgaum
टॅग Belgaum,Kolhapur,Stress