|| अनिकेत साठे

धरणांतील विसर्गामुळे राज्यातील अनेक मार्गावर पूरस्थिती; अभ्यासासाठी ‘मेरी’ला साकडे

कोकणातील तिवरे धरण फुटीमुळे ऐरणीवर आलेला धरण सुरक्षेचा प्रश्न आणि नंतर अतिवृष्टीमुळे राज्यातील बहुतांश भाग जलमय झाल्याने रेल्वे वाहतुकीस बसलेली झळ, या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रशासनाला स्वमालकीच्या सहा जलाशयांचे आरोग्य तपासण्याची उपरती झाली आहे. रेल्वेच्या मुंबई सभोवतालच्या जलाशयांची तातडीने संरचनात्मक तपासणी करावी, यासाठी रेल्वेने येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (मेरी) साकडे घातले आहे.

राज्यातील बहुतांश धरणांची मालकी राज्य सरकार म्हणजे पाटबंधारे विभागाकडे असून काही जलाशय मुंबई, कोल्हापूर महापालिका, रेल्वे, खासगी संस्थांचेही आहेत. राज्य शासनाच्या मोठय़ा, मध्यम प्रकल्पांची तपासणी मेरीच्या अखत्यारीतील धरण सुरक्षितता संघटना करते. मुंबई, कोल्हापूर महापालिकेबरोबर टाटा कंपनीसारख्या खासगी संस्थाही आपल्या धरणांची तपासणी मेरीकडून करवून घेतात. नौदलाच्या आयएनएस शिवाजी संस्थेच्या जलाशयाची तपासणी नियमितपणे होते. तपासणीअंती सुचविल्यानुसार आवश्यक ती दुरुस्ती केली जाते. रेल्वेने मात्र आजवर अशा तपासणीची तयारी दर्शविली नव्हती. धरण सुरक्षितता संघटनेने पाठपुरावा करूनही प्रतिसाद न देणाऱ्या रेल्वेला आता त्याची निकड वाटल्याचे अधिकारी सांगतात.

मुंबई येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने पत्राद्वारे नुकतीच मेरीकडे तशी मागणी केली. मध्य रेल्वेचे मुंबईच्या आसपास विझ जीआयपी, दिघी, पळसदरी, भुशी, रादा, इगतपुरी असे सहा जलाशय आहेत. त्यातील बहुतेक ब्रिटिशकालीन असून त्यांच्या बांधकामाची तातडीने तपासणी करावी, अशी विनंती करण्यात आली. मेरीच्या तज्ज्ञांनी धरणांची प्रत्यक्ष पाहणी करावी. दुरुस्तीची गरज असल्यास त्याचा अंदाजित खर्च सादर करावा, अशी रेल्वेची अपेक्षा आहे. राज्याच्या अखत्यारीतील धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे रेल्वे मार्गाना झळ बसल्याची साशंकता आहे. त्यामुळे रेल्वे मार्ग परिसरातील अशा धरणांचा अभ्यास करावा, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

जलाशय दुरुस्तीची तयारी

मध्य रेल्वेचे मुंबईच्या आसपास सहा जलाशय आहेत. त्यामध्ये विझ जीआयपी (अंबरनाथ), दिघी (ठाणे), पळसदरी (कर्जत), भुशी (लोणावळा), रादा (कसारा) आणि इगतपुरी बंधाऱ्याचा समावेश आहे. यांची संरचनात्मक तपासणी करण्यात येणार आहे. या अहवालानुसार दुरुस्तीची तयारी रेल्वेने दर्शविली आहे.

रेल्वेला पाण्याबाबत काही तांत्रिक मार्गदर्शन हवे असल्यास ते केले जाईल. दुसरा मुद्दा जो धरणातील पाण्यामुळे रेल्वे वाहतुकीला अडथळा आला, त्या उल्हास नदीवर बदलापूर भागात कुठेही मोठे धरण नाही. विसर्ग सोडून महापूर येईल, अशी स्थिती नाही. रेल्वेच्या जलाशयांची तपासणी करून मेरीकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल.    – राजेंद्र पवार सचिव, जलसंपदा विभाग